फरिदाबाद (हरियाणा) : येथे केंद्रीय आर्य युवक परिषद, फरिदाबादच्या वतीने श्रद्धा मंदिर विद्यालयात आयोजित युवक चरित्र निर्माण शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप कौर मुंजाल विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. एक आठवड्याच्या या शिबिरात फरिदाबाद आणि शेजारील गावांतील युवकांनी सहभाग घेतला. यात त्यांना स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट, लाठी काठी, योगासन इत्यादींचे प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी सौ. संदीप कौर यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
१. शिबिरात युवकांना मार्गदर्शन करतांना सौ. संदीप कौर म्हणाल्या की, लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य नष्ट होत आहे. त्यामुळे अशा शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास, तणाव मुक्तीसाठी अध्यात्म आणि धर्मशिक्षण यांचे वर्ग आयोजित करतात.
२. सौ मुंजाल यांनी या वेळी देहलीच्या जंतरमंतर येथे करण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाची माहिती दिली. या आंदोलनात आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या दिवशी होणार्या योगासनांतून ॐ चा उच्चार वगळण्याच्या आदेशाला विरोध करण्यात येणार आहे, असे सांगितले. तसेच हिंदु मुलींना लव्ह जिहादपासून सतर्क रहाण्याचे आवाहन केले. यासाठी सर्व हिंदु कुटुंबांनी जागृत होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
३. श्रद्धा मंदिर विद्यालयाचे संचालक आणि या शिबिराचे स्वागताध्यक्ष डॉ. गजराज आर्य यांनी म्हटले की, भविष्यात केव्हाही हिंदु जनजागृती समिती विद्यालयात कार्यक्रम करू शकते.
४. शिबिराचे अध्यक्ष डॉ. अनिल आर्य यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली एम्टी इंटरनॅशनल स्कूलमध्ये होणार्या विशाल युवक चरित्र निर्माण आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात