Menu Close

हिंदूसंघटनाची आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

Hindu_Rashtra

स्वातंत्र्यपूर्व काळात प्रथम मांडण्यात आलेली हिंदु राष्ट्राची संकल्पना पुढे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या निधर्मी राज्यप्रणालीत विरुन गेली. कारण काँग्रेसने एकगठ्ठा मतांचे राजकारण करण्यासाठी अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणे त्याचबरोबर हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांचे भारत देशातून समूळ उच्चाटणे असा एककलमी कार्यक्रम हाती घेतला. त्यातून हिंदु राष्ट्र हा शब्द उच्चारणे म्हणजे राष्ट्रदोहच होय, अशी हिंदुद्वेषी परिस्थिती राजकीय आणि सामाजिक पातळीवर निर्माण करण्यात आली. असे असतांनाही सनातन संस्थेने दोन-अडीच दशकापूर्वी हिंदु राष्ट्र स्थापनेची घोषणा केली. अशी नुसती घोषणा करून सनातन थांबले नाही, तर देशातील हिंदूंमध्ये धर्म आणि राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी जोमाने कार्याला आरंभ केला. १९ जून ते २५ जून २०१६ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणारे पाचवे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन हे त्याचेच फलित आहे. देशभरातील हिंदूंच्या लहान-मोठ्या संघटना आणि हिंदु धर्मातील संप्रदाय यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने यात सहभागी होणार आहेत. हिंदु राष्ट्र म्हणजे राजकारण नव्हे, तर ही जीवनपद्धती आहे. या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतूनच मानवीकल्याण साध्य होणार आहे. या लेखाच्या माध्यमातून भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची का आवश्यकता आहे, याची कारणमीमांसा करण्यात आली आहे.

असुरक्षित हिंदू !

कालपर्यंत नेपाळ हे जगातील एकमेव हिंदु राष्ट्र म्हणून ओळखले जात होते; मात्र दुर्दैवाने साम्यवाद्यांची हे हिंदु राष्ट्र गिळंकृत केले. त्यामुळे हिंदूंचे स्वतःचे एकही राष्ट्र पृथ्वीतलावर नाही. भारतात हिंदू बहुसंख्य असतांनाही स्वातंत्र्यापासून हिंदूंना जाणीवपूर्वक हिंदु राष्ट्रापासून वंचित ठेवण्यात आले. याउलट जगात ख्रिस्त्यांची १५७, मुसलमानांची ५२, बौद्धांची १२, तर ज्यूंचे १ राष्ट्र आहे; मात्र हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. एक प्रकारे हिंदू जगाच्या पाठीवर अनाथ बनले आहेत. भारतातील अस्तित्वात असलेल्या राज्यव्यवस्था आणि समाजव्यवस्थेसमोर हिंदुहिताचे प्राधान्य नाही; म्हणून हिंदू बहुसंख्येने असूनही ते एकार्थाने भारतात अश्रीत म्हणून अनुभव घेत आहेत, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. याचा परिणाम म्हणून आज हिंदूंची दयनीय अवस्था झाली आहे. हिंदूंची ही दुःस्थिती भारतातील निधर्मी शासनव्यवस्थेच्या माध्यमातून पालटू शकत नाही हे लक्षात घ्यायला हवे. हिंदूंची स्थिती सुधारण्यासाठी आणि भारतासमोरील आंतर्बाह्य समस्या सोडविण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता का आहे, ते पाहू.

१ अ. निधर्मी शासनप्रणालीतील हिंदूंची दुःस्थिती : हल्ली धर्मनिरपेक्ष राज्याचा उदोउदो चालला आहे. भारतात मागील ६८ वर्षांच्या लोकराज्यात (लोकशाहीत) कुठल्याही पक्षाने हिंदूंच्या प्रश्‍नांची सोडवणूक तर दूरच; ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नही केले नाहीत. हिंदूंवर सातत्याने धर्मांधांची दंगलसदृश्य आक्रमणे होत आहेत. लव्ह जिहादमुळे हिंदु मुलींचे जीवन उद्ध्वस्थ होत आहे. हिंदूंच्या सुरक्षिततेचा विचार केला, तर सामान्य हिंदूंना कुणीच वाली नाही. गोमातेची राजरोस हत्या होत आहे. हिंदूंची मंदिरे शासनाच्या ताब्यात आहेत आणि त्याचा पैसा अल्पसंख्यांकांसाठी जात आहे. महागाईने, दुष्काळामुळे जनता होरपळत आहे आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत. सध्याचे कायदे, धोरणे आणि राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव यांमुळे या निधर्मी शासनात जिहादी, भ्रष्टाचारी, बलात्कारी सुखाने नांदत असतील, तर असे राज्य खरे हिंदुहित कधीतरी साधेल काय ? आंतरराष्ट्रीय आस्थापने, परधर्मियांच्या हातात असलेल्या दूरचित्रवाहिन्या, कॉन्व्हेंट शाळा, निधर्मी शिक्षणपद्धती आदी सर्वांमुळे जन्माने हिंदु असलेला हिंदु मनाने आणि आचरणाने परधर्मीय किंवा अधर्मी झाला आहे.

१ अ १. काश्मिरींच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न बिकट : काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना पुनर्वसनासाठी दिल्या जाणार्‍या वसाहतींमधील जागा मुसलमानांनाही दिली जाणार आहे. काश्मीरमधील बहुतांश स्थानिक मुसलमान हे पाकधार्जिणे आहेत आणि आतंकवाद्यांनी त्यांच्याच साहाय्याने काश्मीरमधून हिंदूंना विस्थापित केले आहे. असे असतांना काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाच्या वसाहतीत मुसलमानांनाही जागा देणे आतंकवाद्यांचे अत्याचार सहन केलेल्या काश्मिरी पंडितांसाठी अत्यंत क्लेशदायक आणि असुरक्षिततेचे आहे. अशा या काश्मीरमधील फुटीरतावाद्यांचे समर्थन करणार्‍या पीडीपी पक्षाला पाठिंबा देऊन भाजपने या पक्षाला जम्मू आणि काश्मीर राज्याच्या सत्तेवर बसवले आहे. त्यामुळे काश्मिरी पंडितांच्या घरवापसीच्या आशा आणखी धूसर झाल्या आहेत; म्हणून काश्मिरी हिंदू पंडितांचे काश्मीरमधील पुनर्वसनासाठी आता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचीच आवश्यकता आहे.

१ अ २. हिंदूंचे नेते असुरक्षित : हिंदुबहुल भारतात आतापर्यंत १२७ हिंदू नेत्यांच्या धर्मांधांनी हत्या केल्या आहेत. तसेच अनेकांवर प्राणघातक आक्रमणे करून त्यांना घायाळ केले आहे. हिंदूंचे नेतेच जिथे मारले जातात, तिथे सामान्य हिंदूंची काय स्थिती असेल, याची कल्पना येते. हे हत्यांचे सत्र आजही सुरूच आहे. पूर्वांचल, दक्षिण भारतात हिंदू नेते तेथील स्थानिक राजवटीच्या विरोधात जाऊन हिंदूंच्या रक्षणाचे कार्य करत आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे.

२. इसिसच्या आक्रमणापासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्र : सध्या जागतिक पातळीवर इसिस या सिरीयातील अत्यंत क्रूर इस्लामी आतंकवादी संघटनेने दहशतीचे वातावरण निर्माण केलेले आहे. एक-एक राष्ट्र करत अवघ्या जगावर इस्लामी राजवट आणण्याचा या संघटनेचा हेतू आहे. त्यासाठी या संघटनेने एकेका राष्ट्रावर आक्रमण करून ती राष्ट्रे काबीज करण्याचे सत्र आरंभिले आहे. आता या संघटनेने पाक आणि बांगलादेशात पाय रोवले आहेत. नुकतेच या संघटनेने भारतात प्रथम हिंदूंवर आक्रमण करण्यात येईल, अशी चेतावणीही दिली आहे. निष्पापांचे गळे चिरणार्‍या आणि महिलांवर सामूहिक बलात्कार करणार्‍या इसिसच्या या आतंकवादी संघटनेपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी, तसेच हिंदूंना या आतंकवादी संघटनेच्या विरोधात लढण्यासाठी त्यांचे मानसिक आणि शारीरिक बळ वाढवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे. सध्या सत्तास्थानी असलेल्या नेत्याकडून हिंदूंच्या अपेक्षा आहेत; परंतु प्रत्यक्षात हिंदूंच्या पदरी निराशा पडत आहे. कारण या शासनाला निधर्मी व्यवस्था असलेले भारतीय राज्यच हवे आहे. हिंदु राष्ट्र हा विषय त्यांच्या खिजगणतीतही नाही.

३. हिंदु राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष नव्हे, तर धर्माधिष्ठित असेल ! : भारतातील राज्यप्रणाली आणि कायदेप्रणाली ही अल्पसंख्यांकांसाठी विशेषतः मुसलमान आणि ख्रिस्त्यांना मोकळीक देणारी आहे, तर हिंदूंना सापत्न वागणूक देणारी आहे. यामुळे हिंदूंना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक या सर्व क्षेत्रांत कायम असुरक्षित वाटत आले आहे. स्वातंत्र्यापासून ७ दशके हिंदूंना देण्यात येणार्‍या सतत अपमानास्पद वागणुकीमुळे या देशात हिंदूंचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यांच्या श्रद्धास्थानांवर सतत आघात करून त्यांच्यातील धार्मिकतेचा एकप्रकारे खून करण्यात आला आहे; मात्र त्याच वेळी अन्य धर्मीयांच्या श्रद्धास्थानांचा पराकोटीचा आदर करण्यात येत आहे. त्यामुळे साहजिकज हिंदू वगळता अन्य धर्मीय आणि पंथीय संघटित आहेत, मात्र हिंदू विखुरलेले आहेत. काँग्रेसच्या निधर्मी राज्यप्रणालीच्या कटकारस्थानाचे हिंदू बळी ठरले आहेत. त्यामुळे आपल्याच देशात हिंदूंच्या मनात परकेपणाची भावना वाढीस लागली आहे. अखिल मानवजातीचे कल्याण साधण्याची क्षमता असलेले हिंदु धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे यांचा वारसा लाभलेला हा भारत देश निधर्मी राज्यप्रणालीमुळे अधोगतीला जाऊ लागला आहे. म्हणून देशाच्या पर्यायाने हिंदूंच्या उत्कर्षासाठी भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करणे निकडीचे बनले आहे. हिंदु राष्ट्र ही संकल्पना म्हणजे राजकारण नव्हे तर धर्माधिष्ठित अन् राष्ट्रनिष्ठ जीवन जगण्याची ती एक प्रगल्भ संस्कृती आणि व्यवस्था असेल. मानव, पशू, पक्षी, किडा, मुंगी, झाडे आणि वेली यांपासून सूक्ष्मातीसूक्ष्म जिवांच्या उद्धाराचा विचार बाळगणारी ती एक ईश्‍वरसंकल्पित सामाजिक व्यवस्था असेल; शिवाय जनता सुखी होऊन समृद्ध राष्ट्रासाठी केवळ आर्थिक विकास पुरेसा नसून जीवनाला व्यापणारी सर्व अंगे विकसित होणे आवश्यक असते. धर्म हा जीवनाच्या सर्वांगांना व्यापत असल्याने राष्ट्र हे धर्मनिरपेक्ष नव्हे, तर धर्माधिष्ठित असणेच आवश्यक आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्र हे धर्माधिष्ठितच असेल !

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *