Menu Close

योगाचा समावेश शासनस्तरावर करण्यासाठी प्रयत्न

नागपूर : धनश्री लेकुरवाळे या नागपूरच्या योगपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करीत पदक प्राप्त केले. यामुळे विदर्भाचा आणि देशाचा गौरव वाढला. ही बाब आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद आहे. पण राज्य शासनाने अद्याप योगाचा समावेश क्रीडा प्रकारात मान्य केलेला नाही. योगाचा समावेश शासनस्तरावर मान्यताप्राप्त क्रीडा प्रकार म्हणून व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्याशी बोलून प्रयत्न करणार असल्याचे मत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

नागभूषण फाऊंडेशनच्यावतीने विदर्भाचा लौकिक राज्य व देशपातळीवर वाढविणाऱ्या विद्यार्थी युवक-युवतीला युवा नागभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री सुधीर लेकुरवाळे हिला ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ५० हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खा. कृपाल तुमाने, माजी खा. दत्ता मेघे, उद्योजक ए. के. गांधी, गिरीश गांधी, उद्योजक प्रभाकरराव मुंडले, सत्यनारायण नुवाल उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, अनेक लोक प्रतिभावंत असतात पण परिस्थितीमुळे त्यांना मागे यावे लागते. असे प्रतिभावंत आपली आणि देशाची संपत्ती आहे. आर्थिक स्थिती फारशी चांगली नसतानाही धनश्रीच्या पालकांनी तिला मदत केली त्यामुळेच ती आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करू शकली. योगपटूंना सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संधी असून पंतप्रधानांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

स्त्रोत : लोकमत

Tags : Hinduism

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *