विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : आज भारतीय दंडसंहितेतील १९ व्या कलमाचा उपयोग व्यक्तीनुरूप पालटला जात आहे. श्री. कमलेश तिवारी यांनी कथित धर्मभावना दुखावणारे वक्तव्य केल्याविषयी गेले ७ महिने कारागृहात टाकले आहे; मात्र त्याच वेळी हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे आझम खान आणि अकबरुद्दीन यांच्यावर त्याच कलमानुसार कारवाई होऊनही त्यांना जामीन देण्यात आला.
आज आपण संविधानात योग्य तो पालट करून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची मनीषा बाळगतो; मात्र काही विधीतज्ञ केशव नंदा भारती खटल्याच्या आधारे संविधानाच्या मूळ ढाच्यात पालट करण्यात येणार नाही, असे सांगतात. प्रत्यक्षात या खटल्यातील १३ न्यायमूर्तींपैकी केवळ एका न्यायमूर्तींनी तो निष्कर्ष मांडला होता. अशी सूत्रे हिंदूंना अंधारात ठेवण्यासाठी उपयोगात आणली जातात.हिंदु राष्ट्रात न्यायालयीन प्रक्रियेतील हा खोटेपणा टाळला जाईल आणि सर्वांना समान न्याय मिळेल, असे प्रतिपादन लखनौ (उत्तरप्रदेश) येथील हिंदु फ्रंट फॉर जस्टीसचे अधिवक्ता श्री. विष्णुशंकर जैन यांनी केले. ते पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील पहिल्या दिवसाच्या धर्मरक्षणासाठी न्यायालयीन स्तरावर करावयाचे प्रभावी कार्य आणि वैचारिक मार्गदर्शन या सत्रात बोलत होते.
या सत्राला उपस्थित अधिवक्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सत्राच्या आरंभी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संघटक श्री. नीलेश सांगोलकर यांनी परिषदेच्या यशस्वी कार्याचा वार्षिक आढावा मांडला.