विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : हिंदु संस्कृतीच्या संवर्धनासाठी अमूल्य योगदान देणारे ठाणे येथील प्रा. शिवकुमार ओझा (वय ८३ वर्षे) यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याची आनंदवार्ता येथे चालू असलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी सर्वांना देण्यात आली. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन प्रा. ओझा यांचा सत्कार केला. भगवान श्रीकृष्णाने केलेल्या या कृपेसाठी उपस्थित सर्व धर्माभिमान्यांनी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली.
प्रसिद्धीपराङ्मुखता आणि जिज्ञासा या गुणांचा समुच्चय असणारे ज्ञानसंपन्न प्रा. शिवकुमार ओझा !
प्रा. ओझा यांचे वय ८३ वर्षे आहे; परंतु या वयातही त्यांचा उत्साह युवकांना लाजवणारा आहे. अफाट ज्ञानासह त्यांच्यामध्ये प्रसिद्धीपराङ्मुखता, जिज्ञासा या गुणांचा समुच्चय आहे. हिंदु संस्कृतीचे महत्त्व सर्वांना समजावे, यासाठी आजही ते वेगवेगळ्या देशांत जाण्याची सिद्धता दर्शवतात. त्यांनी चालू हिंदू अधिवेशनासाठी श्रीलंका आणि नेपाळ या देशांतील धर्माभिमान्यांशी संपर्क केला.
ज्ञानशक्तीद्वारे हिंदुत्वासाठी निरपेक्षपणे कार्य करणारे प्रा. ओझा हे हिंदु राष्ट्रातील भारतरत्न ! – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले
एवढी वर्षे हिंदुत्वासाठी निरपेक्षपणे कार्य करणारे प्रा. शिवकुमार ओझा हे हिंदु राष्ट्रातील भारतरत्न आहेत. आज अपात्र व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला जातो. प्रा. ओझा यांच्यासारखेच भारतरत्नासाठी पात्र ठरू शकतात. हिंदु राष्ट्रातील अशाच एका भारतरत्नाचा आज आम्ही सत्कार करत आहोत. सध्या समाजात विचारांची अवहेलना होत आहे. विचारवंत याचाच अर्थ ज्ञानशक्ती असा आहे. ज्ञानशक्ती क्रियाशक्ती आणि इच्छाशक्ती यांना कार्यान्वित करते.
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रियाशक्तीच्या आधारे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, पण त्यांना त्यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या ज्ञानशक्तीचे पाठबळ होते.विद्यारण्य स्वामी यांच्या ज्ञानशक्तीमुळे हरिहर आणि बुक्कराय या वीर बंधूंनी विजयनगरच्या हिंदु राज्याची स्थापना केली. क्रियाशक्तीचे प्रतीक असणारे चंद्रगुप्त मौर्य हे आर्य चाणक्यांच्या ज्ञानशक्तीमुळे भारताचे सर्वांत पहिले सम्राट झाले. या उदाहरणांवरून विचारांचे महत्त्व लक्षात येते. आज क्रियाशक्तीद्वारे कार्य करणारे अनेक आहेत; परंतु राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण, तसेच संस्कृतीच्या संवर्धनासाठी ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करणारे दुर्मिळ आहेत. प्रा. शिवकुमार ओझा हे अशाच प्रकारे ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करत आहेत !