विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : आज हिंदीसह विविध भाषांचा प्रसार केला जातो; मात्र आपल्या भाषांमध्ये अनेक गुण असतांना हे प्रसारक ते गुण सांगू शकत नाहीत. मुलांना शाळांमध्ये हिंदीचे गुण शिकवले गेले पाहिजे. या गुणांचे ज्ञान झाल्यावर मुलांमध्ये भाषेविषयी स्वाभिमान जागृत होईल. हिंदु संस्कृती प्रकट होण्याचे मुख्य माध्यम भाषाच असते. हे माध्यमच मजबूत हवे. असे प्रतिपादन ठाणे येथील प्रा. शिवकुमार ओझा यांनी येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात केले.
प्रा. शिवकुमार ओझा पुढे म्हणाले, आपल्या कुठल्याही प्राचीन ग्रंथांमध्ये संभवत:, कदाचित् अशा शब्दांचा वापर दिसून येत नाही; कारण हिंदु संस्कृतीतील ज्ञान निश्चयात्मक आहे. याउलट पाश्चात्यांचे ज्ञान संशयात्मक बुद्धीचे असल्यामुळे त्यांच्या ग्रंथांमध्ये ठिकठिकाणी संभवत: कदाचित् यांसारख्या शब्दांचा उपयोग केल्याचे दिसून येते. त्यामुळे हिंदूंनी आपल्या संस्कृतीविषयी अभिमान बाळगला पाहिजे. हिंदु संस्कृती जीवनाचे ध्येय सुनिश्चित करते. ही संस्कृती धर्माचे स्वरूप स्पष्ट करते. त्याचबरोबर सृष्टीतील प्रमुख तत्त्वांचे ज्ञानही स्पष्ट करते. ही संस्कृती शाश्वत तत्त्वांच्या आधारावर असल्याने ती सनातन आहे, शाश्वत आहे, ती नष्ट होत नाही.