विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : पंचमहाभुतांचे संतुलन ठेवून जगणे स्वदेशी आहे. केवळ देशात निर्माण झालेली वस्तू उपयोगात आणणे म्हणजे स्वदेशी स्वीकारणे नाही, तर या देशाच्या भूगोलाशी जुळवून घेणेे स्वदेशी आहे. येथील भूगोल हे आमचे राष्ट्र आहे. जेथे आपण रहातो, तेथील पंचमहाभूतांशी संतुलन ठेवून जीवन जगणे हे स्वदेशी आहे. येथील संस्कृतीशी समरस होणे स्वदेशी आहे, असे प्रतिपादन गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा यांनी गोवा येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी प्रथम सत्रात केले.
गाय आणि नंदीच्या गव्यामुळे भारतात वीर पुरुष निर्माण होतील !
ते पुढे म्हणाले, गायीच्या अस्तित्वाशिवाय ही सृष्टीच अपूर्ण आहे. आपण गायीचे सान्निध्य स्वीकारले पाहिजे. पूर्वीचा भारत निर्माण करण्यासाठी गायीचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या राष्ट्रात गाय आणि नंदी नाही, तेथे वीर पुरुष निर्माण होणार नाहीत. समृद्ध गाय आणि समृद्ध नंदी यांच्या गव्यामुळे वीर पुरुष निर्माण होतो. या गव्यामुळेच येथे श्रीकृष्ण आणि अर्जुन निर्माण होतील. त्यामुळे पुन्हा हे राष्ट्र विश्वगुरु बनेल. त्याकरता पुन्हा गायीचे संगोपन होणे आवश्यक आहे.
१९ व्या शतकापर्यंत संपूर्ण भारत विकेंद्रित होता. प्रत्येक जिल्हा, गाव स्वयंपूर्ण होते. त्या त्या भागात मनुष्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता होत होती. प्रत्येक चौकात पाणपोयीची व्यवस्था होती. येथील भाषा, खानपान, ज्ञान, अर्थव्यवस्था, आदी विकेंद्रीत होती; मात्र आता या गोष्टींचे केंद्रीकरण करण्यात आले. त्यामुळे इंग्रजांच्या राजवटीनंतर केवळ ६८ वर्षांत भारताची दुर्दशा झाली, त्याला नष्ट करण्यात आले. सध्या आपला भारत जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष या दोघांच्या कह्यात गेला आहे. त्यातून देशाला मुक्त केले पाहिजे.
पूर्वी प्रजा सुखी असेल, तर राजा सुखी राहील, अशी भावना होती. आता प्रजा दुःखी, पिडलेली असेल, तर त्यांच्यावर राज्य करणे सोयीचे असते, अशी विचारधारा बनली आहे. त्यामुळे जनतेला आजारी पाडण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून देशात आजारपण वाढले आहे. देशातील ५० टक्के जनता गंभीर आजारांनी पीडित आहेत. यामागील कारण आपल्या व्यवस्थेचे केंद्रीकरण असणे हाेय.