रामनाथी : पूर्व पाकिस्तानच्या निर्मितीपासून तेथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत होते. त्यानंतर वर्ष १९७१ मध्ये भारत शासनाने पूर्व पाकिस्तानचा स्वतंत्र बांगलादेश बनवल्यानंतरही हिंदूंवरील अत्याचारांमध्ये वाढच झाली. त्यामुळे कोट्यवधी बांगलादेशी हिंदूंनी भारतात पलायन केले. अखंड भारताचे अविभाज्य घटक असलेल्या या हिंदूंसाठी भारत शासनाने बांगलादेशात स्वतंत्र भूमी (होमलॅण्ड) निर्माण करण्यासाठी दबाव आणावा, अशी मागणी बांगलादेशातील हिंदूंच्या समस्यांवर आवाज उठवणारे निखिल बंग नागरिक संघ या संघटनेचे सचिव श्री. सुभाष चक्रवर्ती यांनी पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनस्थळी २१ जून २०१६ या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. या वेळी नेपाळमधील फोरम ऑफ नेपालीज् मीडियाचे (नेपाळी प्रसारमाध्यम मंच) अध्यक्ष प्रा. निरंजन ओझा, श्रीलंकेतील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन्, युथ फॉर पनून कश्मीर (आपले काश्मीर)चे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल आणि सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस उपस्थित होते.
भारत शासनाने हिंदूंचा छळ करणार्या श्रीलंकेतील शासनावर दबाव आणावा ! – श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन्
५ सहस्र वर्षांपासून श्रीलंकेत नांदत असलेल्या हिंदूंचा तेथील बौद्धांकडून छळ केला जात आहे. श्रीलंकेतील बौद्ध शासनाकडून तेथील हिंदूंचे दमन केले जात आहे. तेथील हिंदूंना गुलामाप्रमाणे वागणूक दिली जात आहे. तेथील मंदिरांचा विध्वंस केला गेला. मूर्ती तोडल्या गेल्या. हिंदूंच्या सर्रास हत्या केल्या जात आहेत. हा छळ गेल्या ६० वर्षांपासून चालू आहे. मे २००९ मध्ये ३ लक्ष हिंदूंना ठार मारण्यात आले आहे. हिंदूंची सुमारे २ सहस्र मंदिरे तोडली गेली आहेत. प्रत्येक गावात सैन्य छावणी स्थापून बौद्ध मंदिर उभारले गेले आहे. देशाच्या हद्दीत येणार्या हिंदू मच्छीमारांना गोळ्या घालणारा श्रीलंका हा एकमेव देश आहे. हिंदूंना मारण्याचा आणि पकडण्याचा अधिकार असलेला तेथील जुलमी कायदा पालटला पाहिजे. यासाठी सक्षम असलेल्या हिंदूबहुल भारत शासनाने तेथील शासनावर दबाव टाकणे अपेक्षित आहे.
नेपाळ हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी भारतातील हिंदूंनी साहाय्य करावे ! – प्रा. निरंजन ओझा, फोरम ऑफ नेपालीज् मीडिया
नेपाळ हे निधर्मी राष्ट्र बनवण्यास तेथील ८५ टक्के हिंदूंनी विरोध केला होता. अलोकशाही पद्धतीने नेपाळला निधर्मी राष्ट्र घोषित करण्यात आले. नेपाळचे संविधान निधर्मी बनवून नेपाळमधील हिंदूंचे धर्मांतर करण्याचा डाव आहे. एक वर्षांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी आमिषे दाखवून हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात आले. वर्ष २०३० पर्यंत नेपाळला ख्रिस्ती राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र आहे. यासाठी नेपाळमधील ख्रिस्ती नेते, ख्रिस्ती संघटनांचा पाठिंबा असलेले नेते, स्वयंसेवी संघटना मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. या आंतरराष्ट्रीय षड्यंत्रामुळे नेपाळ जर ख्रिस्ती देश बनला, तर त्याचा थेट परिणाम भारतावर होणार आहे. यासाठी नेपाळला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी भारत शासनाने, तसेच भारतातील हिंदूंनी साहाय्य करायला हवे, असे प्रतिपादन प्रा. निरंजन ओझा यांनी केले.
भारतात आलेल्या बांगलादेशी हिंदूंना शरणार्थी दर्जा द्या !
श्री. सुभाष चक्रवर्ती पुढे म्हणाले, बांगलादेशमधील ६५ लक्ष हिंदु कुटुंबियांना हटवले गेले. त्यांची ८० लक्ष बिघा (अंदाजे २० लक्ष एकर) भूमी आणि शेतीवाडी जप्त करण्यात आली. पलायन करून भारतात आलेल्या बांगलादेशी हिंदूंना शरणार्थी दर्जा (रेफ्यिूजी स्टेटस) मिळायला हवा. बांगलादेशमधील हिंदूंवरील या अत्याचारांविषयी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात आवाज उठवायला हवा, तसेच भारतीय प्रसिद्धीमाध्यमांनी बांगलादेशातील हिंदूंना साहाय्य करायला हवे. बांगलादेशात हिंदु महिलांची अब्रू लुटणे, भूमी बळकावणे, मंदिर तोडणे, पुजार्यांचे खून करणे आदी अत्याचार बंद होण्यासाठी भारत शासनाने प्रयत्न करून बांगलादेशात हिंदूंना मानाचे आणि सुरक्षित स्थान निर्माण करून द्यायला हवे.
काश्मिरी हिंदूंसाठी केंद्रशासनावर राष्ट्रभरातील हिंदूंनी संघटितपणे दबाव आणावा ! – राहुल कौल
वर्ष १९९० मध्ये आतंकवादग्रस्त काश्मीरमधून ४ लक्ष हिंदूंना पलायन करावे लागले. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना गेली २६ वर्षे विस्थापित काश्मिरी हिंदूंचा हा प्रश्न सोडवता आलेला नाही. काश्मीरमधील विस्थापित हिंदूंना अस्थायी रहिवास देण्याचा शासनाचा विचार आहे. असा अस्थायी रहिवास आम्हाला नको. काश्मीरमधून विस्थापित झालेल्या हिंदूंसाठी स्वतंत्र जागा असायला हवी. या ठिकाणी स्मार्ट सिटी उभारल्यास हिंदूंना आर्थिकदृष्ट्या विकसित होता येईल. काश्मीरमधून ३७० कलम हटवले गेले पाहिजे. विस्थापित झालेल्या काश्मिरी हिंदूंना मानाने काश्मीरमध्ये वास्तव्य करता यावे, यासाठी केंद्रशासनावर राष्ट्रभरातील हिंदूंनी संघटितपणे दबाव आणणे अपेक्षित आहे. या दृष्टीने काश्मिरी हिंदूंसाठी भारतभरात १९ ठिकाणी अधिवेशने घेण्याचे ठरवले आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेशच्या समस्यांवर कृती चालू होण्यामागे हिंदू अधिवेशनाची प्रेरणा ! – चेतन राजहंस
पाकिस्तानमधून भारतात आलेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व मिळणे आणि घुसखोरी रोखण्यासाठी बांगलादेशची भारताशी जोडलेली सीमा सीलबंद करण्याची प्रक्रिया होणे, हे मागील अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांमधून प्रेरणा घेऊन हिंदूंनी केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे, असे श्री. चेतन राजहंस यांनी या वेळी सांगितले.
क्षणचित्र : पत्रकार परिषदेला ८ वृत्तपत्रे आणि ३ वृत्तवाहिन्या यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.