विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : गोवा परशुरामभूमी आहे, तिला देवभूमीही मानण्यात येते. अशा या भूमीला राजकारण्यांनी रोमची भूमी बनवले आहे. येथे ८० टक्के हिंदू आहेत. १३ टक्के ख्रिस्ती आहेत आणि बाकी इतर पंथीय आहेत. असे असतांना देशात देवभूमी असलेला गोवा भोगभूमी असल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे. येथील भाजपचे शासन ख्रिस्त्यांच्या दबावाखाली काम करत आहे. असे प्रतिपादन गोवंश रक्षा अभियानचे अध्यक्ष श्री. हनुमंत परब यांनी गोवा येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी च्या सत्रात केले.
श्री. परब पुढे म्हणाले, एकगठ्ठा मतांसाठी ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यासाठी कार्य करत आहेत. त्यामुळे ते गोमातेसाठी काहीच करू शकत नाहीत. हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामुळे राज्यात असलेेले शासकीय पशूवधगृह वर्ष २०१३ या वर्षी बंद करण्यात आले होते. राज्यशासनाने या पशूवधगृहाच्या आधुनिकीकरणासाठी १६ कोटी रुपये व्यय करून पुन्हा ते चालू केले. गोरक्षकांनी काही अनधिकृत पशूवधगृहे बंद पाडलेली आहेत. त्यानंतर शेजारच्या कर्नाटकातून गोमांस राज्यात येत आहे. याला शासनाचा पाठिंबा आहे. हे शासन हिंदूंसाठी काहीच करत नाही. याचे परिणाम आगामी निवडणुकीत शासनाला भोगावे लागणार आहेत. राज्यात गोवंशाच्या रक्षणासाठी गोवंश हत्याबंदी कायदा आवश्यक आहे. गोवंश हत्याबंदी कायदा संपूर्ण भारतात होईल, त्यासाठी सर्व हिंदुत्ववाद्यांना संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. गोमातेचे रक्षण झाले, तर हिंदु राष्ट्र येईल.