विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागल्यानंतर आज कैरानामधून हिंदूंना पळून जावे लागत आहे. काश्मीरसारखी स्थिती भारतात सर्वत्र येऊ शकत नाही, असे म्हणणार्यांना यावरून धर्मांधांचा धोका लक्षात आला असेलच ! आज काश्मीर हे सूत्र सत्ताधार्यांसाठी ना खाऊ शकतो, ना गिळू शकतो, असे बनले आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला प्रारंभ करत असतांना त्याकरता पहिले उद्दिष्ट म्हणून विस्थापित काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. तसे झाले, तर ते सहजसाध्य असे उद्दिष्ट ठरू शकते. त्याकरता आम्ही २७ डिसेंबर २०१६ या दिवशी देशभरात आंदोलन करणार आहोत. त्यानंतर शासनाने काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन न केल्यास १९ जानेवारी २०१७ या दिवशी सर्व देशभरातील हिंदूंनी काश्मीरमध्ये जाऊन रहायचे, असे आंदोलन छेडूया, असे आवाहन पुणे येथील युथ फॉर पनून कश्मीरचे राष्ट्रीय समन्वयक श्री. राहुल कौल यांनी केले. या आवाहनाला उपस्थितांनी मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद देत याविषयी कृतीशील नियोजन करण्याचे आश्वासन दिले. ते २१ जूनला अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील विविध राज्यांतील हिंदूंची असुरक्षितता या सत्रात बोलत होते.
श्री. राहुल कौल यांनी काश्मीरच्या दुःस्थितीविषयी केलेले विश्लेषण !
१. काश्मीरमधील हिंदूंच्या विस्थापनाचा प्रश्न हे देशभरातील हिंदूंना जोडणारे सूत्र आहे.
२. भाजपने काश्मीरमध्ये पीपल्स डेमॉक्रॅटीक पार्टी (पीडीपी) म्हणजे विघटनवाद्यांशी युती केली आहे. ही युती करतांना काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाविषयी स्वतः निर्णय घेणार, असे पीडीपीने सांगितले आहे. हा निर्णय म्हणजे काश्मिरी हिंदूंच्या मारेकर्यांच्या हाती सत्ता देण्यासारखाच आहे.
३. या प्रश्नाची महत्त्वाची अडचण ही आहे की, येथील शासन काश्मीरमधील हिंदूंच्या वंशविच्छेदाला वंशविच्छेद मानायलाच सिद्ध नाही.
४. आज जम्मू-काश्मीर शासनाने ७ विविध ठिकाणी विस्थापित काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घोषित केला; मात्र तेथे काश्मिरी हिंदूंना रहायला पाठवणे म्हणजे त्यांना कसायाच्या हाती देण्यासारखेच आहे.
५. त्यामुळे तेथे हिंदूंची एकच वसाहत निर्माण व्हावी, ही आमची मागणी आहे.