रामनाथी : केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर परमात्म्याशी एकरूपता साधणे म्हणजे योग आहे, असे प्रतिपादन कोलकाता येथील शास्त्र धर्म प्रचारसभेचे सदस्य डॉ. कौशिक चंद्र मल्लिक यांनी केले. रामनाथी, गोवा येथे चालू असलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने ॐसह योग करण्याविषयी प्रबोधन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
डॉ. मल्लिक पुढे म्हणाले, २१ जून या दिवशी उत्तरायणाचा अंत होतो आणि दक्षिणायनाला प्रारंभ होतोे. शुभारंभ करण्यासाठी हा आदर्श दिवस आहे. शासनाकडून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. योगाचा आरंभ होऊ शकतो, अंत नाही. योग ही एक दिवस नव्हे, तर वर्षभर करण्याची गोष्ट आहे. योग हा हिंदु संस्कृतीचा भाग असतांना तो केवळ हिंदूंचा नाही, तर सर्वांचा आहे, असे भासवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नामस्मरणासह योग केल्यानेच त्याचा लाभ होतो. केवळ शारीरिक स्तरावर योग केल्यास लाभ होत नाही. परमात्म्याशी एकरूपता साधणे, हा योग आहे. केवळ शारीरिक व्यायाम करणे हा योग नाही. योग ही ईश्वराशी भेट आहे. योगाचा योग्य पद्धतीने अभ्यास केला, तर आपल्यासाठी देवाचे दार उघडू शकते. देवाचे दार उघडले जात नसेल, तर तो योग नाही. योगामुळे व्यक्ती परमपदावर पोचू शकते.