विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : भारत पारतंत्र्यात असतांनाही नेपाळ स्वतंत्र हिंदु राष्ट्र होते. आज नेपाळ निधर्मी झाले; कारण त्याला भारतातील राज्यकर्त्यांनी, तसेच काही साम्यवाद्यांनी आणि निधर्मीवाद्यांनी प्रोत्साहन दिले. भारतात कार्यरत असलेल्या ख्रिस्ती मिशनर्यांना नेपाळला निधर्मी बनवून तेथे ख्रिस्तीकरणाची संधी साधायची होती. त्यामुळे आता जर नेपाळला हिंदु राष्ट्र बनवायचे असेल, तर भारतातील हिंदूंनीच त्यासाठी नेपाळच्या शासनावर दबाव आणला पाहिजे, असे कणखर मत फोरम ऑफ नेपालीज् मीडियाचे अध्यक्ष प्रा. निरंजन ओझा यांनी व्यक्त केले. ते पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात २१ जूनला सायंकाळच्या सत्रात बोलत होते.
प्रा. ओझा म्हणाले की, नेपाळमध्ये आजही ८१ टक्के हिंदू आहेत. तेथील बौद्ध जनतेचे ख्रिस्ती मिशनरी धर्मांतर करत आहेत. अगदी भूकंपग्रस्तांनाही धर्मांतराचे आमिष दाखवूनच ख्रिस्त्यांनी साहाय्य केले. त्यामुळे भारताचा लहान भाऊ असलेल्या नेपाळला वाचवण्यासाठी भारतियांनी नेपाळला आधी हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करावा !