विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : हिंदू अधिवेशनामध्ये मी तीन दिवसांपासून उपस्थित आहे. हे अधिवेशन एक संजीवनी आहे. पुढील वर्षी संधी मिळाली, तर या ठिकाणी पुन्हा उपस्थित राहीन. आमच्यासाठी हे हिंदुत्वाचे घर बनले आहे. वर्ष १९४७ मध्ये जेव्हा देशाची फाळणी झाली आणि पूर्व पाकिस्तान निर्माण झाला, तेव्हापासून तेथील हिंदूंचा अधिकार नष्ट झाला आणि त्यांच्यावर अत्याचार करण्यासाठी मुसलमानांना मोकळे रान मिळाले. वर्ष १९७० पर्यंत १ लाखाहून अधिक हिंदूंना पूर्व पाकिस्तातून पळवून लावण्यात आले. २० सहस्र भारतीय सैनिकांनी हुतात्मा होऊन वर्ष १९७० मध्ये बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. तेव्हापासून हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. या हिंदूंची भूमी एका कायद्यान्वये बांगलादेश शासनाने हडप केली. असे प्रतिपादन बंगाल येथील निखिल बंग नागरिक संघचे सचिव श्री. सुभाष चक्रवर्ती यांनी व्यक्त केले. ते पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात बोलत होते.
श्री. चक्रवर्ती पुढे म्हणाले, बांगलादेशात सहस्रो मंदिरे पाडण्यात आली, मूर्ती तोडण्यात आल्या, सहस्रो मंदिरांना आगी लावण्यात आल्या, अनेक मंदिरांना अपवित्र करण्यात आले आहे. हिंदूंची १ लाख कोटी रुपयांची संपत्ती नष्ट करण्यात आली. बांगलादेश आमची मातृभूमी आहे. आपले साहाय्य मिळाले, तर बांगलादेशात आम्ही निश्चित परत जाऊ आणि भारतच नाही, तर बांगलादेश अन् पाकिस्तान येथेही हिंदु राष्ट्राची स्थापना करू. बंगालमध्येही बांगलादेशी घुसखोर स्थानिक हिंदूंवर अत्याचार करत आहेत. तेथील हिंदूंची संपत्ती हडप करत आहेत. तेथील हिंदू शेजारच्या राज्यांमध्ये जात आहेत. या अन्यायाच्या विरोधात हिंदूंनी एकत्र येऊन संघर्ष केला नाही, तर भारतातील बंगाल दुसरा काश्मीर झाल्याशिवाय रहाणार नाही.