विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : भारतात ७३२ दूरचित्रवाहिन्या असून त्यात ४२० वृत्तवाहिन्या आहेत. यातील बहुतांश वाहिन्यांमध्ये विदेशातील पैसा गुंतवण्यात आला आहे. भारतातील देवळांना त्यांच्याकडे आलेले अर्पण अधिकोषात ठेवता येते; मात्र कुठेही गुंतवण्याची मुभा नाही. विदेशातील चर्चला मात्र त्यांचा पैसा भागभांडवल म्हणून व्यावसायिक हेतूने गुंतवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे विविध चर्च त्यांचा पैसा व्यावसायिक आणि धार्मिक कारणासाठी भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये गुंतवत आहेत. परिणामी भारतातील माध्यमे जाणीवपूर्वक हिंदु धर्माच्या विरोधात कार्यरत आहेत, हे वास्तव सुदर्शन न्यूजचे संचालक संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी उघड केले. ते २१ जून या दिवशी सायंकाळच्या सत्रात हिंदु राष्ट्र-स्थापनेतील प्रसारमाध्यमांची भूमिका या विषयावर बोलत होते.
या मार्गदर्शनापूर्वी हिंदुत्वासाठी वाहून घेतलेल्या सुदर्शन वृत्तवाहिनीद्वारे करण्यात आलेल्या मोलाच्या कामगिरीविषयी श्री. चव्हाणके यांचा अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते पुष्प, प्रसाद आणि श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
श्री. चव्हाणके यांनी सांगितले की,
१. आज विविध वाहिन्यांवरील मालिकांमध्ये निधर्मीपणा जपणार्यांना शांतताप्रिय, तर हिंदुत्ववाद्यांना आक्रमक आणि विकृत दाखवले जाते.
२. प्रेमप्रकरण असेल, तर त्यामध्ये तरुणी हिंदु आणि तरुण मुसलमान दाखवला जातो.
३. येथील वृत्तवाहिन्या हिंदुत्वाचे चांगले कार्य दाखवतच नाहीत, उलट नास्तिकतावाद्यांचेच उदात्तीकरण करतात.
४. यामागील खरे कारण म्हणजे त्यांना भारतीय संस्कृती नष्ट करून पाश्चात्त्य संस्कृती रुजवायची आहे.
हिंदुद्रोहाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी श्री. चव्हाणके यांनी सांगितलेली अभिनव कल्पना !
श्री. चव्हाणके म्हणाले की, हिंदुद्रोहाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदूंनी मोठे काही करण्यापेक्षा शासनाकडून उपलब्ध केल्या जाणार्या योजनांचा लाभ उठवला पाहिजे. भारत शासनाने स्थानिक दूरचित्रवाहिन्या आणि आकाशवाणी केंद्रे (एफ्.एम्.) यांसाठी १०० कोटी रुपये राखून ठेवले आहेत. त्यामुळे अत्यल्प व्ययामध्ये बनू शकणारी ही माध्यमे हिंदूंनी चालू केली पाहिजेत. सामाजिक संकेतस्थळांद्वारे आपल्या विचारांचा परिणामकारक प्रसार करा. ही संकेतस्थळे आपल्याला काही प्रमाणात का होईना साहाय्यभूत ठरतील. या विविध कल्पनांद्वारे हिंदुत्ववादी हिंदु धर्माच्या संदर्भातील कार्य अधिक प्रमाणात आणि परिणामकारकपणे करू शकतात.
हिंदुत्ववाद्यांनो, तुमच्या बातम्या आमच्याकडे पाठवा ! – श्री. चव्हाणके
श्री. चव्हाणके म्हणाले की, हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या उपक्रमांच्या बातम्या, त्याचे चित्रीकरण आम्हाला पाठवावे. त्यासाठी आम्ही हे अधिवेशन संपेपर्यंत एक संपर्क क्रमांक देऊ. त्या वृत्तांना आम्ही योग्य ती प्रसिद्धी देऊ, ज्याचा हिंदुत्ववादी संघटनांना लाभ होईल !