विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : श्री. जी. राधाकृष्णन् यांनी चेन्नई येथील आपत्काळात पीडित नागरिकांना केलेल्या साहाय्याच्या संदर्भातील अनुभव सांगितले. या आपत्काळात त्यांना ईश्वराच्या सामर्थ्याची आलेल्या प्रचीतीविषयी बोलतांना ते म्हणाले, तमिळनाडू येथे आलेली त्सुनामी, तसेच राज्यात गेल्या वर्षी आलेला प्रलयकारी पूर या नैसर्गिक आपत्तींमध्ये राज्यातील सहस्रावधी लोक मृत्यूमुखी पडले, लक्षावधी स्थलांतरित झाले, शेतजमिनीचीही पुष्कळ हानी झाली. त्या काळात दळणवळणही ठप्प झालेले होते. विमाने, आगगाड्या (रेल्वे), तसेच अन्य वाहने बंद होती. वर्तमानपत्रे बंद होती. सर्वत्र कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले होते. सर्वत्र रोगराई वाढली होती. एवढी हानी होऊनही काही कल्पनातीत घटना आम्ही अनुभवल्या. पूर आणि त्सुनामी यांमुळे सर्व इमारती, वास्तू उद्ध्वस्त झाल्या असतांना समुद्रकिनार्यावरील मंदिरे, तसेच कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांचे स्मारक अबाधित राहिले. ही देवळे, तसेच स्मारक सुरक्षित तर राहिलेच, याशिवाय देवळांच्या जवळपासच्या भागांमध्ये लोक मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले नाही. ही केवळ देवाच्या सामर्थ्याची लीला आहे. आम्हालाही या पुराचा फटका बसला होता; पण तरीही आम्ही बाधित लोकांना जीवनावश्यक वस्तू पोचवणे, साहाय्यता निधी गोळा करणे, असे साहाय्यकार्य करू शकलो. केवळ ईश्वराच्या कृपेमुळेच त्या काळात प्रसंगी पोहत जाऊनही साहाय्यता कार्य करण्याची आम्हाला शक्ती मिळाली. श्रीकृष्णाच्या कृपेमुळे ही अध्यात्माची शक्ती आम्ही अनुभवू शकलो.
क्षणचित्र : भाषणाच्या समारोपप्रसंगी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना झालेल्या अन्याय्यपूर्ण अटकेचा निषेध करत श्री. जी. राधाकृष्णन् यांनी ते (सर्व हिंदुत्वनिष्ठ) सनातन संस्था आणि साधक यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.