विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : टी.एन्. मुरारी यांनी उस्मानिया विद्यापिठामध्ये बीफ पार्टी ला केलेल्या विरोधातील अनुभव सांगितले. तेलंगणा राज्याच्या निर्मितीमध्ये उस्मानिया विद्यापिठातील साम्यवादी विचारधारा असलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. या विद्यार्थ्यांनी भाग्यनगरच्या उस्मानिया विद्यापिठामध्ये बीफ पार्टी (गोमांस मेजवानी) चे आयोजन केले होते. या मेजवानीला ओवैसी यांच्या एम्आयएम् या पक्षाचाही पाठिंबा होता. या कार्यक्रमाच्या विरोधात केवळ हिंदु जनजागृती समिती आणि शिवसेना समोर आली. कोणत्याही परिस्थितीत ही मेजवानी होऊ देणार नाही, याचा आम्ही निर्धार केला.
श्री. मुरारी पुढे म्हणाले, या कार्यक्रमाच्या विरोधात इतर संघटनांनाही जागृत केले. जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी या कार्यक्रमाला अनुमती नाकारली. त्यानंतर ते उच्च न्यायालयात गेल्यावर तेथेही त्यांना अपयश आले. असे असतांनाही या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम घेण्याचे ठरवले. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांनीही या विद्यापिठामध्ये श्री सरस्वतीपूजन आणि श्री गोपूजन करण्याचे ठरवले. त्यानंतर इतरही हिंदुत्ववादी संघटना आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग वाढला. त्यासंदर्भात शहरात भित्तीपत्रके लावली. त्यानंतर शासनाने १६ हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अटक केली. या विरोधानंतरही आम्ही १० डिसेंबर या दिवशी विद्यापिठात घुसलो आणि श्री सरस्वतीदेवीचे आणि गोमातेचे पूजन केले. त्यामुळे धर्मकार्य करतांना केवळ संख्या नाही, तर संकल्पाचा विचार करणे आवश्यक आहे. बीफ पार्टीचे आयोजन करून धर्मनिरपेक्ष शक्तींना शहरात दंगल घडवून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लाभ घ्यायचा होता.