विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : लक्षावधी वर्षांपासून श्रीलंकेत हिंदूंचे वास्तव्य आहे. ब्रिटीश जेव्हा सोडून गेले, तेव्हा ती हिंदू भूमी म्हणून आम्हाला मिळाली; पण आज त मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध यांची लोकसंख्या वाढली असून पोलिसांकडून तेथील हिंदूंचे दमन केले जात आहे. निरपराध हिंदूंना गोळ्या घालून ठार केले जात आहे. श्रीलंकेत हिंदूंचा पद्धतशीरपणे वंशविच्छेद चालू असून तेथील हिंदूंच्या साहाय्यासाठी, तसेच त्यांना आधार देण्यासाठी भारत, बांगलादेश आणि नेपाळ येथील हिंदुत्वनिष्ठांनी श्रीलंकेत यावे, असे कळकळीचे आवाहन श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांनी येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात केले.
ते पुढे म्हणाले, संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान यांचा अमूल्य ठेवा आपल्याला मिळाला आहे. तो आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचा आहे. या संस्कृतीचा प्रसार, प्रचार करण्यासाठी, तसेच आचरण करता येण्यासाठी घटनात्मक कार्यप्रणाली निर्माण व्हायला हवी. केवळ भारत, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या ठिकाणी नाही, तर जेथे जेथे हिंदू आहेत, त्या सर्वच ठिकाणी हिंदु राष्ट्र निर्माण व्हायला हवे.
अखंड हिंदु राष्ट्राचा विजय असो !
श्री. सच्चिदानंदन् यांनी श्रीलंकेतील हिंदूंचा कसा क्रूरतेने छळ केला जातो, यासंदर्भातील बीबीसी या वृत्तवाहिनीचे चलत्चित्र (व्हिडिओ) मार्गदर्शनाच्या दरम्यान स्क्रीनवर दाखवले. असाहाय्य हिंदु स्त्रिया, लहान मुले यांचा आक्रोश, हात-पाय बांधलेल्या हिंदु पुरुषांची गोळ्या झाडून निर्दयपणे केली जाणारी हत्या आदी मन हेलावून टाकणारे प्रसंग पाहिल्यानंतर सर्व हिंदुत्वनिष्ठ स्तब्ध झाले. श्री. सच्चिदानंदन् यांनी श्रीलंकेतील हिंदूंना आधार देण्यासाठी तेथे येण्याचे आवाहन केल्यावर उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी अखंड हिंदु राष्ट्राचा विजय असो ! अशा उत्स्फूर्त घोषणा देत श्रीलंकेतील हिंदूंना समर्थन दिले.