रामनाथी (गोवा) : गोव्यातील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव साजरे केले जातात; मात्र दुर्दैवाने या उत्सवांमध्ये रात्रीच्या वेळी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जुगार चालतो. यात येथील सहस्रो लोक सहभागी होतात. मंदिर समितीतील सदस्यच त्यांच्या उत्सवांमध्ये जुगार लावतात. यात कोट्यवधी रुपयांच्या काळ्या पैशांची उलाढाल होते. मंदिर समितीच्या लोकांसह स्थानिक राजकारणी, पोलीस यांचे संगनमत आहे. त्यामुळे हा प्रकार अनेक दिवसांपासून चालू आहे. जुगाराचे जेवढे टेबल लागतात, त्याप्रमाणे पोलिसांचे हप्ते ठरलेले असतात. एवढेच नाही, तर गुन्हे अन्वेषण विभागालाही (सीआयडीला) यातील वाटा मिळतो. त्यामुळे तेही वरच्या स्तरावर त्याचा वास्तविक अहवाल पाठवत नाहीत. असे ठाम प्रतिपादन गोवा येथील भारत स्वाभिमानचे राज्यप्रमुख श्री. कमलेश बांदेकर यांनी केले. ते अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील २२ जूनच्या सत्रात बोलत होते.
गोवा राज्य बाहेरून जरी श्रीमंत वाटत असले, तरी येथील बहुतांश जनता गरीब आहे. यामागील कारण जुगार आहे. त्याहीपेक्षा जुगारामुळे होणारी धर्माची हानी गंभीर आहे. या जुगाराला मी विरोध चालू केला. त्यामुळे गुंडांनी माझ्या घरावर दगडफेक केली, तसेच पोलिसांच्या विरोधालाही समोरे जावे लागले. असे असतांनाही आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवले. प्रशासनाच्या वरच्या स्तरावर तक्रारी आणि पाठपुरावा चालू ठेवला. त्याचबरोबर मंदिर समितींचेही प्रबोधन चालू ठेवले. आता आमच्या तालुक्यामध्ये जुगार बंद झाला आहे. राजकारणीही हळूहळू त्यांचा सहभाग अल्प करत आहेत. काही मंदिर समितींनीही जत्रोत्सवात जुगार लावणे बंद केले आहे. ईश्वराच्या कृपेने जुगाराच्या विरोधातील आंदोलनामध्ये यश मिळत आहे. येणार्या काळात उत्तर गोव्यातील जुगार पूर्णपणे बंद होईल, याची आम्हाला निश्चिती आहे.