पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या दुसर्या टप्प्यातील हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनाला सर्वांगीण हिंदूसंघटनासाठी निश्चयात्मक प्रारंभ
विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा पहिला टप्पा १९ ते २२ जून या कालावधीत पार पडला. या ४ दिवसांत धर्मजागृतीचे उपक्रम, त्यातील अडचणी आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा यांविषयी अभ्यासपूर्ण विचारमंथन झाले. २३ जूनला हिंदु राष्ट्र-संघटकांसाठीच्या अधिवेशनाला प्रारंभ झाला. हिंदु राष्ट्रासाठी समाजप्रेमी, धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, संत, अधिवक्ता, पत्रकार, आधुनिक वैद्य, उद्योजक आदींचे महासंघटन उभारण्याची कृतीशील दिशा आपल्याला ठरवायची आहे. त्यासाठी पद, पक्ष, मान-सन्मान यांचा अहं विसरला पाहिजे; कारण या गोष्टी हिंदूसंघटनाला मारक आहेत. अहं-निर्मूलनासाठी साधना आवश्यक आहे. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्यावर सर्व गोपगोपींनी आपल्या काठ्या लावून महत्त्वाचा वाटा उचलला, त्याप्रमाणे आपणही हिंदु राष्ट्रासाठी तन, मन, धन अर्पण करण्याची सिद्धता ठेवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. ते पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातील हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनाच्या प्रथम सत्रात बोलत होते. या वेळी व्यासपिठावर बंगाल येथील शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. शिव नारायण सेन, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक येथील समन्वयक श्री. रमानंद गौडा, सनातन संस्थेच्या नवी देहली येथील प्रवक्त्या कु. कृतिका खत्री हे उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात दणाणर्या हिंदु धर्माच्या घोषणांनी या सत्राला प्रारंभ झाला.
२. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुुरु डॉ. जयंत आठवले यांनी या अधिवेशनाला दिलेल्या आशीर्वचनाचे श्री. रमानंद गौडा यांनी वाचन केले.
३. पू. डॉ. पिंगळे यांनी त्यांच्या मार्गदर्शनाच्या शेवटी गुुरु आणि देवता यांना प्रार्थना केली की, हे हिंदूसंघटनाचे कार्य आपणच आमच्याकडून करवून घ्या. या कार्यातील सर्व अडथळे दूर होऊ देत.
४. या वेळी सर्व धर्मनिष्ठांनीही हात जोडून मनःपूर्वक प्रार्थना केली.
५. डॉ. शिवनारायण सेन यांचे प्रकृतीस्वास्थ्य चांगले नसतांना ते या अधिवेशनामध्ये मार्गदर्शनासाठी उपस्थित राहिले.
६. सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री यांनी धर्मप्रसार करतांना सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभावीपणे वापर कसा करावा ?, याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
७. सभागृहात क्रांतीपुरुषांच्या संदर्भातील प्रदर्शन लावण्यात आले होते.