विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आम्हाला क्षात्रतेजाबरोबर ब्राह्मतेजाचीही आवश्यकता आहे. इतिहास हा विषय अपरा विद्येतील मोठा विषय आहे. हिंदु समाजामध्ये आपल्या धर्म, परंपरा, पूर्वज यांविषयी गौरव निर्माण व्हावा, यासाठी भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन झाले पाहिजे. असे आवाहन मध्यप्रदेश येथील प्रा. रामेश्वर मिश्र यांनी येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात केले.
प्रा. मिश्र पुढे म्हणाले, युरोपमधील सर्व देशांना २०० वर्षांपूर्वीपेक्षा अधिक काळाचा इतिहास नाही. त्यामुळे युरोपियन समाजाने लंडनच्या राजांना केंद्रबिंदू मानून इतिहास लिहिला आहे. रामायण, महाभारत यांना हे लोक इतिहास म्हणत नाहीत. खोटारड्या, लबाड लोकांनी लिहिलेला खोटा इतिहास आमच्यावर थोपला जात आहे. इंग्लंड आणि फ्रान्स या देशांचा इतिहास शिकवून आम्ही देशाला महान बनवू शकत नाहीत. खर्या इतिहासाठी आपण लढले पाहिजे. जर खरा इतिहास शिकवत नसतील, तर आम्ही दुसरी विश्वविद्यालये निर्माण करू, असे हिंदूंनी सांगितले पाहिजे. आपला महापराक्रमी सम्राट केंद्रबिंदू असलेला खरा इतिहास लिहिला गेला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या संस्कृतीनुरूप कायदे बनवण्यासाठी आपण शासनावर दबाव आणला पाहिजे. देवता आणि धर्म यांचा अवमान करणार्यांना कडक शासन करण्याची तरतूद या कायद्यांत असली पाहिजे. दुर्दैवाने भारतात अल्पसंख्यांकांना धार्मिक अधिकार असलेले कायदे आहेत; मात्र हिंदूंना नाहीत.