Menu Close

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्मप्रेमी घडण्यासाठीचे अनमोल माध्यम : धर्मशिक्षणवर्ग !

अखिल भारतीय हिंदु राष्ट्र-संघटक अधिवेशनात डॉ. उदय धुरी यांनी केलेले मार्गदर्शन

Uday_Dhuri
डॉ. उदय धुरी

‘अधर्म मूलं सर्वरोगानाम्’ म्हणजेच ‘अधर्माचरण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे’ असे प्रसिद्ध वचन आहे. धर्माचरण करण्यासाठी धर्माचे शिक्षण घेतले पाहिजे. मुसलमान-ख्रिस्ती यांच्याकडे तशी धर्मशिक्षणाची व्यवस्था निर्माण केलेली आहे; मात्र हिंदूंमध्ये या व्यवस्थेचा अभाव आहे. तसेच ‘धर्मशिक्षण नसणे, हे सर्व समस्यांचे मूळ आहे’, हे लक्षात न आल्यामुळे अनेक हिंदुत्ववादी संघटना कित्येक दशकांपासून कार्य करत असूनही धर्मशिक्षणच न दिल्याने त्या हिंदुबहुल भारतातही हिंदुत्व बळकट करू शकल्या नाहीत. त्यामुळे सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समाजाला धर्मशिक्षण देण्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यानुसार हे धर्मकार्य चालू केले.

‘धर्माची हानी रोखायची असेल, तर धर्माचाच आधार घेतला पाहिजे. ‘धर्मो रक्षति रक्षितः।’ या वचनानुसार धर्म हेच निर्गुण ईश्‍वराचे सगुण रूप आहे. त्यामुळे प्रथम धर्म समजून घेतला पाहिजे. त्याचे आचरण करून अनुभूती घेतली पाहिजे, तरच धर्मावर श्रद्धा बसून धर्मरक्षण करता येते. हे होऊ नये, यासाठी मोगल आक्रमकांनी हिंदूंची विश्‍वविद्यालये, ग्रंथ आणि संहिता जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, तर ब्रिटिशांनी लॉर्ड मेकॉलेच्या माध्यमातून गुरुकुल शिक्षणपद्धतीवर बंदी आणून ख्रिस्ती कॉन्व्हेंट चालू केले आणि हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्यावरच प्रतिबंध आणला. परिणामी म्हणून हिंदूंची आजची पिढी आपल्याच धर्माला नावे ठेवणारी आणि पाश्‍चात्त्य गैरप्रथांचे समर्थन करणारी बनली. त्यांना स्वतःच्याच धर्माचा अभिमान नाही. त्यामुळे धर्मपरिवर्तन करणार्‍यांचे, तसेच हिंदु धर्मविरोधकांचे फावले आहे. आज तथाकथित ‘सेक्युलर’ वाहिन्यांवरून केला जाणारा हिंदु धर्मविरोधी प्रचार, जे.एन.यू. सारख्या विद्यापिठांतून हिंदु धर्मावर केली जाणारी टीका, तसेच ‘महिषासुर जयंती’सारखे कार्यक्रम पाहिल्यावर हिंदु धर्मविरोधक यशस्वी झाल्याचे दिसत आहे. यामुळे या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाय काढायचा असेल, तर आता हिंदूंना धर्मशिक्षण देण्याला दुसरा पर्यायच नाही. धर्मशिक्षण, धर्माचरण, धर्मसेवा अन् साधना आदींच्या माध्यमातून कृतीप्रवण झालेले धर्मप्रेमीच हिंदु राष्ट्र स्थापन करू शकतात.

१. धर्मशिक्षणाची आवश्यकता

१ अ. धर्मशिक्षण मिळाल्याने नेमके धर्माचे महत्त्व कळून धर्माचरण आणि धर्मरक्षण होणे : हा विषय समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघू. सर्वसामान्य माणसाला गणपतीचे आध्यात्मिकदृष्ट्या कार्य किंवा अर्थ ठाऊक नसतो, उदा. गणपति ही देवता दुभाषाप्रमाणे कार्य करणारी देवता आहे. ती मानवाच्या नादभाषेचे रूपांतर प्रकाशभाषेत करून त्याने केलेली प्रार्थना इष्टदेवतेला पोचवते. गणपति ही विघ्नहर्ता असून दहाही दिशा मोकळ्या करणारी देेवता आहे; म्हणून सर्व विधींपूर्वी गणेशपूजन करतात.

हे शास्त्र आपल्याला कळले, तर हळूहळू श्री गणेशाविषयी आपल्यात भाव निर्माण होईल. कोणत्याही विधीपूर्वी आपण भावपूर्वक गणेशपूजन करू. त्यातून अनुभूती येतील. त्यामुळे श्रीगणेशाविषयी श्रद्धा निर्माण होऊन आपण त्याच्या चरणी कायम नतमस्तक राहू. तसेच त्याचे विडंबन आपण कधीही सहन करणार नाही. इतकेच काय, गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवातील अपप्रकारही आपण खपवून घेणार नाही. यावरून सर्वांसाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता लक्षात येईल.

१ आ. धर्महानी टाळण्यासाठी : धर्मशिक्षणाच्या अभावी हिंदूंमधील देवतांविषयीचा भावच नष्ट होत असून त्यांचा मनाप्रमाणे वापर केला जातो, उदा. जिन्यात कुणी थुंकू नये; म्हणून देवतांच्या चित्रांच्या टाइल्स लावणे, तसेच उत्पादनांच्या वेष्टनांवर देवतांची चित्रे छापून त्यांचा व्यापार वाढवण्यासाठी करणे, देवतांचा वापर करून ‘कार्टून’ बनवणे. हे सर्वथा अयोग्य आहे. धर्मशिक्षणामुळे देवतांचा असा व्यावसायिक वापर बंद करून धर्महानी टाळता येते.

१ इ. उत्सवांतून होणारे अपप्रकार टाळून त्यांचा आध्यात्मिक लाभ होण्यासाठी : गणेशोत्सव, नवरात्र, दहीहंडी इत्यादी धार्मिक उत्सवांतून तर सध्या अपप्रकारच अधिक होतांना दिसतात. दारू पिणे, जुगार खेळणे, मोठ्या आवाजात ध्वनीप्रदूषण करून इतरांना त्रास देणे, देवतांच्या मूर्ती चित्र-विचित्र आकारांत, रूपांत बनवणे, अशा अपप्रकारांतून देवतेची कृपा कशी प्राप्त होऊ शकेल ? उत्सवांचा खर्‍या अर्थाने समाजाला लाभ होण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.

१ ई. हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी : हिंदूंनी आपले धर्मग्रंथ न वाचल्याने त्यांची स्वधर्माविषयी श्रद्धा न्यून होऊ लागते. याचा कावेबाज ख्रिस्ती धर्मप्रचारक वापर करून धर्मांतर घडवून आणतात. परिणामी आज भारतात वर्षाकाठी आठ लक्ष हिंदूंचे धर्मपरिवर्तन होत आहे. हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे.

२. धर्मशिक्षणवर्गाचे प्रत्यक्ष नियोजन कसे करावे ?

२ अ. धर्मशिक्षणवर्गाच्या मागणीचा अभ्यास कसा करावा ? : अनेक ठिकाणांहून धर्मशिक्षणवर्ग घेण्याची मागणी येते. या वेळी आपल्याकडे उपलब्ध मनुष्यबळानुसार वर्गांचे प्राधान्य ठरवावे. जेथे आपल्याला प्रत्यक्ष जाणे शक्य नाही, तेथे धर्मासाठी एकत्र येण्याचे महत्त्व सांगून धर्मविषयक ध्वनी-चित्रचकत्यांच्या आधारे धर्मशिक्षणवर्ग घेण्यास सांगू शकतो. मुसलमान कुठेही असले, तरी त्यांच्या धर्मानुसार वेळ झाल्यावर कुणी प्रमुख येण्याची वाट न पहाता नमाज पढतातच, तसेच हिंदूंनीही आपल्या ठरलेल्या वेळी धर्मासाठी एकत्र जमण्याची सवय करायलाच हवी.

२ आ. धर्मशिक्षणवर्गाचे स्थळ कसे ठरवावे ? : वर्गाचे स्थळ निश्‍चित करतांना शक्यतो मंदिर किंवा सभागृह निवडावे. सदर ठिकाण मध्यवर्ती असावे. त्या ठिकाणाशी संबंधित विश्‍वस्तांशी आधीच बोलून लेखी अनुमती घ्यावी. यामुळे नंतर त्या वर्गाला कुणाचाही विरोध होणार नाही.

२ इ. धर्मशिक्षणवर्गाचा वार आणि वेळ कशी ठरवावी ? : धर्मशिक्षणवर्गाचा वार आणि वेळ ठरवतांना वर्गातील अधिकांश जणांना सोयीचा वार आणि वेळ ठरवावा.

३. धर्मशिक्षणवर्ग आदर्श होण्यासाठी वर्गसेवकाने करावयाचे प्रयत्न

३ अ. धर्माचरण करणे : वर्ग घेणार्‍याने सात्त्विक पोषाख परिधान करणे आणि कपाळाला नियमितपणे टिळा/कुंकू लावणे, या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत. आपण प्रत्यक्ष कृती केली, तरच त्याचे अनुकरण वर्गातील धर्मप्रेमी करतील, हे लक्षात घेतले पाहिजे.

३ आ. वेळेपूर्वी उपस्थित रहाणे

३ इ. तोंडवळा हसतमुख ठेवणे

३ ई. वर्गात घ्यावयाच्या विषयांचा अभ्यासकरणे : धर्मशिक्षणवर्ग ही साधना असल्याने वर्गसेवकाने वर्गात मांडायचा विषय अभ्यासपूर्णरित्या मांडला पाहिजे. विषय अभ्यासपूर्ण असल्यासच येणार्‍या धर्माभिमान्यांची वर्गात येण्याची रुची टिकून रहाते.

४. धर्मशिक्षणवर्गाची रूपरेषा

४ अ. वेळेनुसार वर्गात घ्यावयाचे विषय आणि त्यांची कालमर्यादा
टीप १ – पुढील सप्ताहात धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी करावयाच्या कृतींचे नियोजन करून देणे

४ आ. आरंभीचा श्‍लोक आणि प्रार्थना : धर्मशिक्षणवर्गाच्या आरंभी विघ्नहर्त्या श्री गणेशाचा ‘वक्रतुंड महाकाय…’ हा श्‍लोक म्हणावा आणि त्याचा अर्थही समजून सांगावा. त्यानंतर प्रार्थनेचे महत्त्व सांगून वर्ग निर्विघ्नपणे होण्यासाठी, संघटनाचा भाव निर्माण होण्यासाठी आणि जलद गतीने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करावी.

४ इ. धर्मशिक्षणाचा विषय : धर्मशिक्षणवर्ग सेवकाने धर्माभिमान्यांनी केवळ विषय न ऐकता त्यांना त्या संदर्भातील कृती करता यावी, अशा प्रकारे विषयाची मांडणी करावी.

४ ई. प्रायोगिक भाग : धर्माचरणाची केवळ तात्त्विक माहिती देण्यापेक्षा त्या कृतीचा प्रायोगिक भाग सादर केल्यास धर्माभिमान्यांना त्या कृती अनुभवता येऊन त्यांची धर्माचरणाची आवड वाढते, उदा. ‘वाढदिवस कसा साजरा करावा ? नमस्कार कसा करावा ?’, अशा धर्माचरणाच्या कृती शिकवतांना त्यांतील काही कृती धर्माभिमान्यांना करून दाखवून त्या त्यांच्याकडूनही लगेचच करवून घ्याव्यात.

५. साधना आणि आढावा

साधना हा आपल्याला अपेक्षित हिंदु राष्ट्राचा पाया आहे. धर्मशिक्षणवर्गाला येणार्‍या धर्माभिमान्यांना साधना सांगणे आणि त्यांना प्रत्येक आठवड्यात साधनेशी संबंधित लहान-लहान कृती सांगून त्यांचा आढावा घ्यायला हवा, उदा. नामजपाला प्रारंभ करणे, नामजप करण्याची वेळ वाढवणे, नामजप भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करणे.

६. धर्महानीचा विषय

त्या त्या आठवड्यात हिंदु धर्म, राष्ट्र, तसेच समाज यांच्यावर झालेल्या आघातांच्या संदर्भात माहिती सांगावी. प्रतिदिन ‘दैनिक सनातन प्रभात’ वाचतांनाच या आठवड्यातील वर्गात सांगावयाच्या आघातांची सूची करावी, तसेच अन्य दैनिके, वृत्तवाहिन्या, संदेश यांचेही साहाय्य घेऊ शकतो. या आघातांच्या संदर्भातील वृत्त त्यावरील योग्य दृष्टीकोन, त्यातून लक्षात येणारे संघटनाचे महत्त्व, तसेच आपण करावयाचे प्रयत्न, अशा प्रकारे या आघातांची मांडणी करावी. आघातांची निवड करतांना प्राधान्याने स्थानिक घटनांविषयी चर्चा केल्यास समवेत कृतीचेही नियोजन करता येते. आघातांच्या संदर्भात ध्वनीचित्र-चकती उपलब्ध असल्यास तीही दाखवू शकतो.

७. शंकानिरसन

शंकानिरसन हे धर्मशिक्षणवर्गाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. आपण मांडलेल्या विषयाच्या संदर्भात धर्माभिमान्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन झाल्यास त्यांना ती कृती करणे सोपे होते. त्यामुळे आपले विषय मांडून झाल्यावर ‘त्यात कुणाला शंका आहेत का ?’, हे आवर्जून विचारावे. कुणी शंका न विचारल्यास धर्माभिमान्यांच्या मनात उद्भवू शकतात, अशा संभाव्य प्रश्‍नांचा विचार करून शंकानिरसन करावे. तसेच ‘शंकानिरसन समाधानकारक झाले का ?’, याचीही निश्‍चिती करावी.

८. बुद्धीभेद करणारे किंवा वितंडवादासाठी विचारलेले प्रश्‍न

सर्व देवतांनी भारतातच जन्म का घेतला ?, या देवांना भारताबाहेर कुणी ओळखत का नाही ?; हिंदु धर्मानुसार पहिली पत्नी जिवंत असतांना दुसरा विवाह करणे अनुचित आहे, तर मग राजा दशरथाने चार विवाह कसे केले ? असे प्रश्‍न विचारणारे जिज्ञासू नसतात. केवळ विरोधासाठी विरोध करणारे असतात. अशांना वेळ देऊ नये.

९. पुढच्या आठवड्याभरासाठी लहान-लहान कृती सांगणे

वर्गामध्ये प्रत्येक वेळी पुढील आठवड्यात करावयाच्या धार्मिक कृती, तसेच समितीचे उपक्रम यांसमवेत टिळा लावणे, प्रार्थना करणे, देवळात योग्य पद्धतीने दर्शन घेणे, यांसारख्या लहान-लहान अन् सहजशक्य अशा कृतीही सांगाव्यात.

९ अ. पुढील सप्ताहातील नियोजन : धर्माभिमान्यांना कृतीशील बनवण्याच्या दृष्टीने हे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यात सेवेचे महत्त्व सांगून सर्वांचा उत्स्फूर्तपणे सहभाग करवून घ्यायला हवा. प्रारंभी लहान-लहान कृतींचे नियोजन करावे. धर्मशिक्षणवर्गाच्या पूर्वसिद्धतेचे दायित्वही घेण्यास त्यांना प्रेरित करावे. पुढे वेळोवेळी राबवले जाणारे उपक्रम आणि आंदोलने यांतही त्यांचा सहभाग होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.

९ आ. पुढील वर्गातील विषय सांगून जिज्ञासा निर्माण करणे : पुढील वेळी आपण कोणता विषय घेणार आहोत ?’, हे त्यांच्या मनातील जिज्ञासा जागृत होईल, या दृष्टीने सांगावे.

९ इ. वर्ग वेळेत संपवणे : वर्ग जसा वेळेत आरंभ करायला हवा, तसेच तो वेळेत संपवलाही पाहिजे.

१०. श्‍लोक आणि कृतज्ञता

वर्गाच्या समाप्तीपूर्वी सर्वांना धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगावी, तसेच श्रीकृष्णाच्या ‘कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने । प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ।’ या श्‍लोकाने समाप्ती करावी.

११. दैनिक/साप्तााहिक/पाक्षिक सनातन प्रभातचे वर्गणीदार बनवणे

आगामी काळातील आपत्काळ पहाता हिंदूंना सप्ताहातून एक दिवस नव्हे, तर प्रतिदिनच धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. हे धर्मशिक्षण आणि धर्मावरील आघातांच्या घटना केवळ ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होत असल्याने धर्माभिमानी हिंदूंसाठी ‘सनातन प्रभात’ म्हणजे धर्मशिक्षणवर्गच आहे. या दृष्टीने धर्मशिक्षणवर्गातून सक्रीय होऊ इच्छिणार्‍यांना ‘सनातन प्रभात’चे महत्त्व सांगून वर्गणीदार बनण्याची विनंती करावी. ज्या ठिकाणी ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे शक्य नाही, तिथे आपण आठवड्याचे अंक गोळा करून त्या धर्मशिक्षणवर्गात वितरित करू शकतो, तसेच ज्यांच्याकडे ‘इंटरनेट’ची सुविधा आहे, त्यांना संगणकाद्वारे किंवा भ्रमणभाष संचातून ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर जाऊन प्रतिदिन अंक वाचण्यास सांगू शकतो. तसेच हिंदी आणि इंग्रजी वृत्ते प्रतिदिन मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे HinduJagruti.org हे संकेतस्थळ वाचू शकतो. प्रतिदिन आपल्याला या संकेतस्थळावरील बातम्यांचे ‘न्यूजलेटर’ही प्राप्त होऊ शकते. ‘अ‍ॅण्ड्रॉइड’ प्रणाली असणार्‍या भ्रमणभाष संचासाठी ‘दैनिक सनातन प्रभात’चे ‘अ‍ॅप्लीकेशन’ उपलब्ध असून त्याद्वारेही ‘दैनिक सनातन प्रभात’ घरबसल्या वाचता येऊ शकते.

१२. समारोप

धर्मशिक्षणवर्ग चांगला व्हावा, यासाठी या सूत्रांचा मार्गदर्शक सूत्रे म्हणून उपयोग करता येईल. तसेच यापेक्षा अधिक चांगल्या कल्पना सुचल्यास त्याही वापरू शकता. या उपक्रमातून प्रत्येक वर्गसेवकाने आपली देवाच्या प्रती कृतज्ञता, शरणागती, प्रार्थना, श्रद्धा, भाव आदी वाढवण्याकडे लक्ष दिल्यास देवाला अपेक्षित असा धर्मशिक्षणवर्ग घेण्याची सेवा आपल्याकडूनही होईल. धर्मशिक्षणवर्ग आपल्या आध्यात्मिक उन्नतीस, तसेच समाजातील क्षात्र आणि ब्राह्म तेज वाढवण्यासाठी पूरक ठरावा, ही धर्मसंस्थापक योगेश्‍वर भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’

– डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *