विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : राष्ट्रवादासाठी धर्म आणि साधना हेच मूळ आहे. केवळ राष्ट्रवादासाठी नाही, तर जीवनाच्या सार्थकतेच्या दृष्टीनेही हे आवश्यक आहे. यामुळे चित्त निर्मळ होते. राजनीती हा मूळ संस्कृत शब्द आहे. ज्या समाजव्यवस्थेला पाहिल्यानंतर मन प्रसन्न होते, उल्हासित होते, ती नीती ही राजनीती आहे. राजधर्मच सर्वांचा आदर्श आहे. आता जे चालू आहे, ती राजनीती नाही, तर पॉलिटिक्स आहे. आपल्याला राजनीतीकडे जायला हवे. फाळणीच्या वेळी भारतमातेचे विभाजन झाले, असे म्हटले जाते. हे चुकीचे आहे. जी भारतमाता स्वतः जगदंबा आहे, तिचे विभाजन कसे होऊ शकते ? भारताचे विभाजन झाले, याचा अनुवाद चुकीचा केला गेला. याऐवजी भारताचा काही भाग इस्लामच्या बाजूने दिला, हे त्याचे योग्य भाषांतर होईल. देशद्रोही अशा प्रकारे चुकीचे समज पसरवतात. अशी वक्तव्ये साधनेच्या अभावामुळे केली जातात. असे प्रतिपादन मध्यप्रदेश येथील प्रा. रामेश्वर मिश्र यांनी येथील पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात केले.
प्रा. मिश्र पुढे म्हणाले, भारतमाता म्हणजे कोणी नेता नाही. भारतमातेला तुमची आवश्यकता नाही, तुम्हाला तुमचे जीवन सार्थक करण्यासाठी तिची आवश्यकता आहे, हे त्या अभाग्यांच्या लक्षात येत नाही. आता भारतमातेच्या नावाखाली नेत्यांची सेवा केली जात आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य ही केवळ लोकशाहीला वलयांकित करण्यासाठी केलेली व्याख्या आहे. धर्मशास्त्रामध्ये असे कुठेही लिहिलेले नाही. या विशाल भारताला तोडण्यासाठी त्याची युरोपशी तुलना केली जाते. या सर्व गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी शास्त्राचे ज्ञान होणे आवश्यक आहे. साधनेविना असलेला राष्ट्रवाद विनाशाकडे नेणारा आहे.