इस्तंबुल : तुर्कीमधील इस्तंबूल शहरातील अतातुर्क विमानतळावर दहशतवाद्यांनी घडविलेल्या तीन आत्मघाती बॉम्बस्फोटात ३६ जण ठार झाले असून, १५० हून अधिक जण जखमी आहेत. इस्लामिक स्टेटने (इसिस) हा हल्ला घडवून आणला आहे.
तुर्कीच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी हा हल्ला झाला. विमानतळावर तीन आत्मघाती हल्ले करण्यात आले. हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. तुर्कीचे पंतप्रधान बिनाली यिल्दीरीम यांनी इसिसकडून हा हल्ला घडविण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. हल्लेखोरांनी सुरवातीला विमानतळाबाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकांवर जोरदार गोळीबार केला. त्यांनतर विमानतळात प्रवेश करत दहशतवाद्यांनी आत्मघाती स्फोट घडविले. इस्तंबुल विमानतळावरुन मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक होते. युरोपातील हे तिसऱ्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ आहे. तुर्कीमधील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी हा हल्ला समजला जात आहे.
पंतप्रधान यिल्दीरीम म्हणाले की, दहशतवादाचा जगाला धोका असल्याचे हे स्पष्ट आहे. निष्पाप नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. इसिसनेच हा हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही हल्ल्याचा निषेध करत हा हल्ला अमानवी आणि भयावह असल्याचे म्हटले आहे. मार्चमध्ये बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सच्या विमानतळावर स्फोट घडवून आणण्यात आले होते. या स्फोटात १६ जण ठार झाले होते.
संदर्भ : सकाळ