डेहराडून (उत्तराखंड) : वर्ष २०१३ च्या जलप्रलयामध्ये भक्कमपणे टिकून राहिलेल्या केदारनाथ मंदिराचा पाया कमकुवत झाला असून त्यामुळे मंदिराच्या पुढच्या भागातील भिंत किंचित झुकल्याचे आयआयटी चेन्नईच्या अहवालामध्ये म्हटले आहे. मंदिराच्या संरक्षणाचे दायित्व असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने हा पाया सशक्त करण्यासाठी परिसरातील पृष्ठभागाला जलरोधक (वाटरफ्रूप) बनवण्याचे काम चालू केले आहे. या अहवालात मंदिराचे गर्भगृह मात्र चांगल्या स्थितीत असून मंदिरातील सभा मंडपाचे छत कमकुवत झाल्याचे म्हटले आहे. हे कार्य पुढील मोसमापर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
भारतीय पुरातत्व खात्याच्या डेहराडून येथील विभागीय कार्यालयाच्या लिली धस्माना यांनी म्हटल्यानुसार मंदिराच्या दक्षिण भागाच्या पहिल्या मजल्यावरील दगडांमधील रुंदी वाढत आहे. त्याचबरोबर सभा मंडपाच्या छताचेही दगड उखडत आहेत. त्यांना लाकडी आधार देण्यात आला आहे. नंतर त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्यात येणार आहेत. आयआयटी चेन्नईच्या सल्ल्यानुसार मंदिर परिसरातील भूपृष्ठाच्या दगडांना रेती, विटांचा चुरा, तसेच उडिद डाळ, गूळ, बेलगिरीचा मसाला यांच्या मिश्रणाने जोडण्यात येत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात