नवी देहली : ढाका इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी बांगलादेश व इस्लाम धर्मावर टीका केली आहे. ‘इस्लाम हा शांततावादी धर्म आहे असे म्हणणे आता बंद करा,’ असे त्यांनी म्हटले आहे.
ढाक्यातील हल्ल्यानंतर एका मागोमाग एक ट्विट करत तस्लिमा यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘बांगलादेश दहशतवादाला खतपाणी घालत असून तो जागतिक दहशतवादाला पाठिंबा देणारा एक प्रमुख देश आहे. बांगलादेशातील नागरिकांचा ३६ देशांमधील दहशतवादी संघटनांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचा आरोप तस्लिमा यांनी सलीम समाद यांच्या हवाल्याने केला आहे. इतकेच नव्हे तर, इस्लाम धर्माची कठोर समीक्षा करताना ‘कृपा करून आता तरी इस्लामला शांतताप्रेमी धर्म म्हणणे बंद करा, असे त्यांनी म्हटले आहे.
‘गरिबी आणि निरक्षरतेमुळे दहशवादी तयार होतात हा गैरसमज आहे. त्या म्हणतात, ‘ढाक्यात हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांनी निब्रस इस्लाम तुर्की होप्स स्कूल, नॉर्थसाऊथ आणि मोनाश विद्यापीठातून शिक्षण घेतले होते. इस्लामच्या नावावर त्यांचे ब्रेनवॉश करण्यात आले आणि ते दहशतवादी झाले. ढाका हल्ल्यातील सर्व दहशतवादी श्रीमंत कुटुंबातील असून त्यांनी चांगल्या शाळांमधून शिक्षण घेतले आहे. ‘
शेवटच्या ट्विटमध्ये त्यांनी इस्लामिक दहशतवादी बनण्यासाठी तुम्हाला गरिबी, निरक्षरता, ताण-तणाव, अमेरिकेच्या परदेश नीतीच्या अभ्यासाची आणि इस्रायलच्या कारस्थानांची गरज नसून फक्त इस्लामची गरज असल्याचे म्हटले आहे.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स