Menu Close

जुने गोवे येथील हात कातरो खांब संरक्षित स्मारकांच्या सूचीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया चालू !

हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांना यश !

hatkatro_khamb_goa

पणजी : हिंदु जनजागृती समितीने केलेली मागणी आणि आंदोलनाची चेतावणी यांची दखल घेऊन गोवा राज्य पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याकडून जुने गोवे येथील हात कातरो खांबाला संरक्षित स्मारकांच्या सूचीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. विविध तज्ञ, तसेच संबंधित खात्यांचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या संवर्धन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हात कातरो खांबाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

गेली ४ वर्षे हिंदु जनजागृती समिती हात कातरो खांबाला संरक्षित स्मारक घोषित करावे, यासाठी प्रयत्न करत आहे. समितीने माहिती अधिकाराखाली हात कातरो खांबाविषयी अत्यंत विश्‍वसनीय माहिती, ऐतिहासिक संदर्भ आणि इतर तपशील प्राप्त केला आहे. या सर्व माहितीच्या प्रती जोडून समितीने मुख्यमंत्री, पुरातत्व खाते यांना वेळोवेळी निवेदन देऊन हात कातरो खांबाच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती. तसेच वाढत्या शहरीकरणामुळे आणि वाहतुकीमुळे सदर वास्तूस धोका निर्माण झाला असून त्याला सुरक्षा मिळणे आवश्यक होते; मात्र या वास्तूस संरक्षित स्मारकाचा दर्जा न दिल्यामुळे त्याला कोणतीही सुरक्षा मिळत नव्हती. यासंदर्भात उलटसुलट लेखदेखील इतर वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाले आहेत. यात भर म्हणून आपसारख्या राजकीय पक्षाने स्वत:च्या प्रचाराचे पोस्टरदेखील हात कातरो खांबावर चिकटवून असंवेदनशीलतेचा कहर केला होता. हिंदु जनजागृती समितीने आपच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच फोंडा येथे मोठे आंदोलन करून हात कातरो खांबास संरक्षित स्मारक घोषित करावे, अशी जोरदार मागणी राज्य आणि केंद्र शासनांकडे करण्यात आली आहे. सर्व घटनाक्रमांची नोंद घेऊन पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याच्या संचालिका यांनी गोवा पुरातन स्मारक आणि ऐतिहासिक वास्तू जतन कायदा १९७८ आणि नियम १९८० प्रमाणे स्थापन केलेल्या संवर्धन समिती समोर हात कातरो खांबाचा विषय चर्चेसाठी आणि पुढील कारवाईसाठी ठेवला आहे. याविषयी पत्राद्वारे पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याच्या संचालिका मेंडेरा यांनी समितीला कळवले आहे. त्यानंतर संवर्धन समितीची बैठक झाली असून या बैठकीत हातकातरो खांबाचा विषय चर्चेस आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

स्वाभिमानासाठी बलीदान देणार्‍या गोमंतकियांचा स्मृतीस्तंभ असलेला हात कातरो खांब

हात कातरो खांब ही स्वाभिमानासाठी बलीदान देणार्‍या गोमंतकियांचे एक प्रतीक आहे. त्यांचा तो स्मृतीस्तंभ आहे. धर्मसमीक्षण सभेच्या (इन्क्विझिशन)च्या नावाखाली पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर केलेल्या भयानक अत्याचाराचा हा स्तंभ महत्त्वाचा साक्षीदार आहे. हात कातरो खांबाचे जतन केल्यास आपल्या पूर्वजांच्या बलीदानाची जाणीव पुढील पिढीच्या मनात जागृत राहील. शौर्य आणि इतिहास यांची स्मृती जागृत ठेवणार्‍या वस्तू आणि वास्तू यांचे महत्त्व मोठे आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी एखाद्या राष्ट्रावर परकियांनी केलेल्या अथवा जुलमी राजवटींनी केलेल्या अत्याचाराच्या खुणा आज जर्मनी, अमेरिका, रशिया यांसारख्या राष्ट्रांत जतन केल्या जात आहेत. त्यामुळे या हात कातरो खांबाचे जतन होणे अत्यंत आवश्यक आहे.


गोवा राज्यातील हातकातरो खांबाकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष

पोर्तुगिजांच्या गुलामगिरीचे स्मरण करून देणार्‍या चर्चच्या जतनासाठी शासन कोट्यवधी रुपये व्यय करते; मात्र त्यांनी हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांचे प्रतीक असलेल्या हातकातरो खांबाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, असेच दिसते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

प्राचीन स्मारक म्हणून घोषित न झाल्याचा परिणाम

पणजी : जुने गोवा येथील ऐतिहासिक हातकातरो खांब अजूनही प्राचीन स्मारक म्हणून घोषित न झाल्याने त्याकडे पुरातत्व खात्याने दुर्लक्ष केले आहे. हातकातरो खांबाची ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करण्यासाठी त्याला प्राचीन स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांनी शासनाकडे अनेक वेळा केली होती; मात्र शासनाने या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.

प्राप्त माहितीनुसार, जुने गोवा येथील हातकातरो खांब प्राचीन स्मारक म्हणून घोषित न झाल्याने त्यावर भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण किंवा पुराभिलेख आणि पुरातन वास्तू संचालनालय किंवा गोवा शासन अधिकृत हक्क सांगू शकत नाही. गोवा राज्यात शेकडो ऐतिहासिक वास्तू असल्या तरी यामधील अत्यल्प वास्तूंचा भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण आणि पुराभिलेख आणि पुरातन वास्तू संचालनालय यांच्या प्राचीन स्मारकांच्या सूचीत समावेश झालेला आहे. गोवा जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा प्राचीन स्मारकांच्या दोन सूची बनवण्यात आल्या. यामधील पहिल्या सूचीत राष्ट्रीय स्तरावर महत्त्व असलेल्या २१ प्राचीन स्मारकांचा समावेश करण्यात आला आणि पुढे ही सूची भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण यांना वास्तूंच्या संवर्धनासाठी देण्यात आली. दुसर्‍या सूचीमध्ये राज्यस्तरावर महत्त्व असलेल्या ५१ प्राचीन स्मारकांचा समावेश करण्यात आला. ही सूची पुराभिलेख आणि पुरातन वास्तू संचालनालय या खात्याला देण्यात आली. विशेष म्हणजे या दोन्ही सूचीमध्ये जुने गोवा येथील हातकातरो खांब याचा समावेश करण्यात आलेला नाही. हातकातरो खांब हा पोर्तुगीज काळात हिंदूंवर लादलेल्या इन्क्विझिशनचे एकमेव प्रतीक आहे; मात्र काही तज्ञांच्या मते राज्यात इन्क्विझिशनसंबंधी असलेल्या थोडीफार माहितीमध्ये या हातकातरो खांबाचा समावेश नाही. हा खांब पूर्वी जुने गोवा येथील गांधी सर्कलकडे होता आणि नंतर तो सध्या असलेल्या जुने गोवा बगलमार्गावर स्थलांतरित करण्यात आला. काहींच्या मते पूर्वी गुन्हा करणार्‍यांना शिक्षा म्हणून हातकातरो खांब कडे आणून त्यांचे हात कापले जात होते. जुने गोवा येथील लोकांच्या मते हातकातरो खांबा हा प्राचीन वारसा असून त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. हा हातकातरो खांबा जुने गोवा बगलमार्गावर अन्यत्र हलवू नये, तसेच त्या ठिकाणी या वारशाचे संवर्धन करण्यासाठी वाहतूक बेट बांधावे, असे जुने गोवा येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

इतिहासतज्ञ प्रजल साखरदांडे यांच्या मते हातकातरो खांबाला ऐतिहासिक महत्त्व असल्याने त्याचे भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण किंवा पुराभिलेख आणि पुरातन वास्तू संचालनालय यांनी संवर्धन केले पाहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *