बेंगळुरू (कर्नाटक) येथे अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या विरोधात पत्रकार परिषद
बेंगळुरू (कर्नाटक) : कर्नाटकात हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही लोक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा, यासाठी शासनावर दबाव आणत आहेत. सध्या असलेले अनेक कायदे सक्षम असून वेगळ्या कायद्याची आवश्यकता नाही. अंधश्रद्धेच्या संदर्भात शासनाने जनजागृती करण्याचे काम केले पाहिजे. शासनाने प्रस्तुत कायद्यात श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी स्पष्ट कल्पना दिलेली नाही. शासनाचा हा कायदा म्हणजे हिंदु देवस्थान, हिंदूंचे धर्माचरण, मठाधिपती यांच्यावर आघात करण्याचा प्रयत्न आहे. शासनाने हा कायदा पारित केल्यास त्याचा सर्वनाश होईल, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटक अनिष्ट, अमानवीय अंधश्रद्धा कायद्याच्या विरोधात ६ जुलै या दिवशी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले.
अंधश्रद्धेच्या नावाखाली सनातन धर्माच्या आचरणाचा निषेध करणे अयोग्य ! – डॉ. महर्षी आनंद गुरुजी, बेंगळुरू, कर्नाटक
ॐकाराने दिवसाचा प्रारंभ करणार्या हिंदु संस्कृतीला काही लोक अंधश्रद्धा ठरवण्याचा प्रयत्न करतात, हे अयोग्य आहे. भगवी वस्त्रे धारण करून धर्मविरोधी बोलणे अयोग्य आहे. काही बुद्धीवाद्यांनी बुद्धीहिनासारखे काम करणे दुर्दैवी आहे. धर्मरक्षणासाठी प्रत्येकाने लढा दिला पाहिजे. सनातन हिंदु धर्मात आध्यात्मिकता, आचरण आणि उच्च मूल्यांना महत्त्व देण्यात आले आहे. भारतमातेच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी संघटीत होणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी जनजागृती, धर्मजागृती होणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन डॉ. महर्षी आनंद गुरुजी यांनी केले.
कर्नाटक अनिष्ट, अमानवीय अंधश्रद्धा कायदा हिंदुविरोधी आहे ! – श्री. अमृतेश, अधिवक्ता उच्च न्यायालय, बेंगळुरू, कर्नाटक
मुख्यमंत्र्यांच्या मोटारीवर कावळा बसला, तर ती श्रद्धा कि अंधश्रद्धा ? ते आधी स्पष्ट करावे. कर्नाटकाच्या परंपरेने आलेल्या स्वामीजींच्या अभिप्रायांचा संग्रह विचारात का घेतला नाही ? पूर्वी मठांचे सरकारीकरण करण्याचे ठरले होते; परंतु मठांच्या विरोधाला तोंड द्यावे लागल्याने पुढील अधिवेशनात ते रहित करावे लागले होते. शासन पुन्हा काही हिंदुविरोधकांना समवेत घेऊन अंधश्रद्धा कायद्याच्या माध्यमातून हिंदूंवर आघात करण्यास सरसावले आहे, अशी टीका अधिवक्ता श्री. अमृतेश यांनी केली.
हिंदु धर्माचा सर्वनाश करण्यासाठी शासनाने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणण्याचा प्रयत्न करणे दुदैवी ! – श्री. चेतन मणेरीकर, अधिवक्ता, हिंदु विधीज्ञ परिषद
१. या कायद्याचा मसूदा सिद्ध करतांना हिंदु धर्माविषयी सखोल ज्ञान असलेले हिंदु संत किंवा आध्यात्मिक प्रमुख यांच्याशी सल्लामसलत केलेली नाही अथवा त्यांचा अभिप्रायही विचारला गेला नाही.
२. शासन अनेक धर्म असलेल्या या समाजाला आणखी विभाजीत करण्याचा प्रयत्न करत आहे. हा मसुदा अहंकार, अज्ञान आणि वंचनेने प्रेरित असा आहे.
३. हा मसूदा तुच्छ मन असलेल्यांनी सिद्ध केला असल्याने तो ख्रिश्चन, मुसलमान इत्यादी धर्मांना त्याने त्याच्या परिघाच्या बाहेर ठेवले असून सनातन हिंदु धर्माला त्याने लक्ष्य केले आहे.
४. या मसुद्याला हिंदु धर्मावर आघात करणे आपले आद्य कर्तव्य आहे, असे वाटते. ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मात अंधश्रद्धेला तोटा नाही. वाईट शक्तींपासून रक्षण व्हावे, शुभ घडावे म्हणून ताईत बांधणे, दर्ग्यात प्रार्थना करणे, मोहोरममध्ये स्वतःला चाबकाने मारून घेणे इ. सर्व अंधश्रद्धा नव्हेत का ? क्रॉस धारण करणे, असाध्य रोग बरा होण्यासाठी पवित्र जल देणे, श्रद्धा चिकित्सा, ख्रिस्त अथवा मेरी यांच्यासाठी मेणबत्ती लावणे, ख्रिस्ताविषयीचा भावोद्रेक हे सर्व अंधश्रद्धेतच मोडते.
५. मसुद्याची कच्ची प्रत सिद्ध करणारे अधिकतर हिंदु धर्म आणि त्याच्या परंपरांविषयी द्वेष भावना ठासून भरलेले समतावादी आहेत.
६. अंधश्रद्धेविरुद्ध गार्हाणे नोंदवण्याचे सर्वाधिकार पोलीस आणि जागरुकता समितीच्या हाती देण्यात आले आहेत. हे अधिकार निश्चितच निरपराध हिंदू, स्वामीजी, मठ, देवस्थानातील कार्यकारी मंडळ आणि ज्योतिषी यांना दुर्बल करण्यासाठीच वापरले जाणार.
७. प्राण्यांना मानेजवळ कापून (कोंबडी, बकरी इ.) रक्तस्रावात मरेपर्यंत ठेवणे, ही क्रूर अंधश्रद्धा असून त्यावर निर्बंध घालून त्या कृतीला शिक्षेला पात्र ठरवले आहे. त्याच मसूद्यात हलालविषयी दुर्लक्ष करण्यात आले आहे. हलालमध्ये जिवंत प्राण्याचा गळा चिरून रक्तस्राव होण्यास सोडून क्रूरपणे मारण्यात येते. कर्नाटकासह जगात अनेक ठिकाणी प्रतिदिन हलाल करण्यात येते.
८. हा मसूदा बकरी ईदच्या दिवशी बकर्यांच्या आणि थँक्स गिव्हींगच्या दिवशी डुकरांच्या करण्यात येणार्या सामूहिक हत्यांविषयी मौन धारण करतो. प्राण्यांविषयी क्रौर्य थांबवण्यासाठी इतर कायदे आहेत. हा मसूदा वेगळा कायदा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली आणत असल्याचे पाहून आश्चर्य वाटते.
९. अंधश्रद्धा मसूद्याच्या अंतर्गत अपराध म्हणून ठरवण्यात आलेले अपराध भारतीय दंडसंहिता १९६०, प्राण्यांवरील क्रौर्य निर्बंध कायदा १९६०, मानवाधिकार रक्षण १९५५, सती पद्धती निर्बंध १९८२ यात समाविष्ट आहेत. नवीन मसूदा अंमलात आणण्याची काहीच आवश्यकता नाही. वरील कलमे हिंदु धर्माचरण कायदेशीर रितीने निषिद्ध ठरवण्याची शक्यता असल्याने राज्य शासनाने सध्या प्रचलीत असलेले कायदे सक्षम करून अंधश्रद्धेच्या नावाखाली होत असलेेले अनिष्ट दूर केले पाहिजे.
पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवर
१. डॉ. महर्षी आनंद गुरुजी, संस्थापक, ब्रह्मर्षी आनंदसिद्धीपीठम्
२. श्री. अमृतेश एन्.पी. अधिवक्ता, उच्च न्यायालय, बेंगळुरू
३. श्री. चेतन मणेरीकर, अधिवक्ता, हिंदू विधीज्ञ परिषद
४. श्री. गुरुप्रसाद, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, कर्नाटक
५. सौ. अनुपमा रेड्डी, संस्थापक अध्यक्ष, अनुबंध ट्रस्ट
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात