पाकिस्तान : दहशतवाद विरोधी कारवाईअंतर्गत पोलिस पथकाने आयसिसला मदत पुरवणाऱ्या ६ महिलांना अटक केली आहे. सिंध प्रांतात ही कारवाई करण्यात आली. या महिला आयसिस दहशतवाद्यांना विवाहासाठी मुलींचा पुरवठा करत होत्या. तसेत आर्थिक मदतही करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलिस अधीक्षक उमर खाताब यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
मे महिन्यात दोन श्रीमंत व्यक्तींनी येथील ४५ इस्मायली शिया पंथियांची हत्या घडवून आणली होती. प्रवासी बसमध्ये हे हत्याकांड घडवले गेले. या प्रकरणी तपास करत असताना या व्यक्तींच्या पत्नी आयसिससाठी काम करत असल्याचे उजेडात आले, अशी माहिती खाताब यांनी दिली. मानवाधिकार कार्यकर्ता साबीन मेहमूद यांचीही हत्या याच गटाने केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
धक्कादायक माहिती मिळाली
या गटाचे लॅपटॉप, हार्ड डिस्क व इतर कागदपत्रे आणि यूएसबी स्टिक्सही पोलिसांनी जप्त केली आहे. त्यातून त्यांच्या दहशतवादी योजनांची सविस्तर माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले. एका सुव्यवस्थित संकेतस्थळाचीही केवळ यासाठीच निर्मिती करण्यात आल्याचे वास्तव यातून समोर आले.
या संकेतस्थळाच्या अॅडमिन्समध्ये स्थानिक प्राध्यापक,लब्ध प्रतिष्ठित व्यक्ती आणि प्रस्थापित शैक्षणिक संस्थातील विद्यार्थी व त्यांच्या पत्नीही सक्रिय असल्याचे उघड झाले. आयसिससाठी काम करणारे मोठे कडे येथे असल्याचे या कारवाईत उघड झाले आहे. दरम्यान, गुप्तहेर यंत्रणा अतिशय कुचकामी असल्याचे या घटनेवरून उजेडात आले आहे.
पूर्वीच कुणकुण होती
खाताब यांनी सांगितले की, कराचीत असे नेटवर्क असावे याची पोलिसांना पूर्वीपासूनच कुणकुण होती. इस्मायली शियांच्या हत्येनंतरच हा संशय अधिक बळावल्याचे ते म्हणतात. श्रीमंत महिलांचा यात अधिक भरणा आहे. अशा २० महिला पाकमध्ये सक्रिय असल्याचा अनुमान पोलिसांनी वर्तवला आहे. या मुलींचे ब्रेनवॉशिंग करून त्यांना आयसिसच्या दहशतवाद्यांशी लग्न करण्यास भाग पाडतात असे सिद्ध झाले. यासाठी या महिला आयसिसचे व्हिडिआे तरुणींना दाखवतात.
विद्यापीठांवर आयसिसचे गारूड
कारी युसूफ, अादील बट्ट, साद अजिज, खालीद युसूफ, आेमर काथीउर यांनी शियांची हत्या केल्याचे तपासात सिद्ध झाले असून यांच्या पत्नी आयसिसला मदत देण्यात सक्रिय आहेत. अनेक विद्यापीठांवरही आयसिसचे गारूड असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्त्रीरोग तज्ज्ञ महिलांचाही यात भरणा असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
पत्नींची चौकशी
हे नेटवर्क उघड होण्यास प्राध्यापकांच्या पत्नींचे जबाब कारणीभूत ठरले. प्राध्यापक खालीद युसूफ आणि अादील मसूद बट्ट यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नींची चौकशी करण्यात आली. त्यानंतर या व्यापक नेटवर्कचा छडा लागला. आयसिसला आर्थिक मदत केल्याप्रकरणी अादील बट्ट, खालीद युसूफ बारी, सलीम अहेमद, मोहंमद सुलेमान सईद यांना अटक करण्यात आली. ही घटना पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
स्त्रोत : भास्कर