लहानपणी घरातील ज्येष्ठ व्यक्ती संस्कारक्षम कथा सांगत. त्यात एक उ:शाप मिळावा म्हणून वाट पाहणारा गंधर्व हे पात्र नेहमी आपणांस भेटत असे. कथेतल्या त्या शापित गंधर्वाला शेवटी न्याय मिळत तर असे, परंतु हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यातील एक तेज:पुंज गंधर्वाला आयुष्यात दुर्लक्षित जीवन कंठावे लागले. उचित सन्मान असा लाभलाच नाही. तरीही या महान नररत्नाने कधीही त्याचा ना खेद मानला किंवा ना खंत केली. सर्वस्वाचा त्याग करीत ‘इदं न मम। राष्ट्राय स्वाहा।’ या दधिची ऋषींच्या असीम व्रताचे पालन केले.
आजही मला १५ जून १९६१ या मृत्युंजय दिनी स.प. महाविद्यालयाच्या प्रांगणात वीर तात्यारावांचा सेनापती बापटांच्या हस्ते झालेला जाहीर सत्कार स्मरतो, आठवतो. तात्यारावांनी सत्काराला उत्तर देताना आरंभीच उद्गार काढले, ‘बहुधा तुमच्या दृष्टिकोनातून मी देशभक्त नसेनही, परंतु खुनी देशद्रोही म्हणून मला अपमानित तरी करू नका.’ आज हिंदुस्थानी संरक्षण दलाला तरुण अधिकार्यांची कमतरता भासत असून हजारो अधिकारी पदे रिकामी आहेत. मुख्यत: वैमानिकांची देशाला अत्यंत गरज आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९४० च्या दशकात अवहेलना सोसून, रिक्रूटवीर देशद्रोही असा शेलक्या शब्दांत अपमान होत असतानाही ती टीका पुष्पहार समजून स्वीकारली.
ब्रिटिश राज्यकर्ते आपल्या हिंदूविरोधी सुप्त विचाराने एक षड्यंत्र रचत होते. इंडियन रॉयल आर्मी, नेव्ही व एअर फोर्समध्ये मुस्लिम तरुणांची भरती करीत होते. हिंदूंच्या क्षात्रतेजाची अवहेलना होत होती. ब्रिटिशधार्जिणे अधिकारी व कारकुनांची फौज उभी राहत होती. ती अनीती लक्षात घेऊन तात्याराव सैन्याचा विचार करीत असताना संधी मिळाली ती दुसर्या महायुद्धाची. ही एक पर्वणी आहे हे ओळखून तात्यांनी सैनिकीकरणाचा जप सुरू केला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून संदेश दिला, ‘लेखण्या तोडा, बंदुका उचला’ आणि आश्चर्य म्हणजे एक लाखाहून जास्त बहुसंख्याक तरुण सैन्यात सामील होऊन हिंदूंची सैन्यावली संख्या तीन चतुर्थांश इतकी झाली. इतकेच नव्हे तर देशगौरव सुभाष बाबूंना सत्तर हजारांपेक्षा जास्त प्रशिक्षित असलेले युद्धबंदी अनायासे आझाद हिंद सेना उभी करण्याच्या मदतीला आले. म्हणून आधुनिक काळातील हिंदुस्थानी सशस्त्र सेनादलाचे प्रणेते तात्याराव व सुभाषचंद्रच आहेत असे म्हणावेसे वाटते.
खरे तर तेव्हा ब्रिटिश सैन्यात दाखल होणार्या हिंदुस्थानींची स्थिती अस्पृश्यांपेक्षाही दयनीय होती. कारण एतद्देशीय (नेटिव्ह) सैनिकाला गद्दार, देशद्रोह म्हणून वाळीत टाकत होता तर ब्रिटिश अधिकारी ‘काला आदमी’ म्हणून अपमानित करून अवहेलना करीत होता. अशा संकटसमयी फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरच सैनिकांना भावनिक, नैतिक आधार देऊन म्हणत, ‘अरे, स्वातंत्र्य दृष्टिपथात येताच या संगिनी उलट्या वळवून गोर्यांना धडा शिकवा. क्षात्रतेजाचे दर्शन घडवा.’ झालेही तसेच. मुंबईस्थित हिंदुस्थानी आरमाराने बंड पुकारताच ब्रिटिश पंतप्रधान लॉर्ड अॅटली यांनी हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये कबुली दिली की, हिंदुस्थानी सैन्य इत:पर साथ देणार नाही. तेव्हा हिंदुस्थानातले चंबुगबाळे लवकर उचलून हिंदुस्थानला स्वातंत्र्य देणे भाग आहे. हा सावरकरांच्या सैन्यभरती कार्यक्रमाचा विजय होता. ते वर्ष होते १९४५.
अहिंसा, शांती, बंधुभावाच्या अतिरेकी तत्त्वज्ञानात गुंतलेल्या तत्कालीन हिंदुस्थानी सरकारला स्वा. सावरकर सतत सक्षम संरक्षण सिद्धतेबद्दल इशारा देत होते. चीनच्या सुप्त विस्तारवादी व साम्राज्यशाही राक्षसी आकांक्षेची जाणीव करून देत होते. सैन्य उभारणी करताना सात भगिनी (सेव्हन सिस्टर) म्हणजे पूर्वोत्तर सीमा भागाकडे संरक्षण सिद्धतेवर भर देणे गरजेचे आहे, असेही आग्रही प्रतिपादन तात्याराव व सरदार पटेल करीत असत. सरदार पटेलांनी याबाबत मृत्यूपूर्वी १५ दिवस अगोदर लिहिलेले पत्र जिज्ञासूंनी अभ्यासावे, परंतु आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचे डोहाळे लागलेल्या आमच्या नेत्यांनी त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले.
mountaineering warfare training ची सेनापतींची /सैन्यांची मागणी दुर्लक्षित करण्यात आली. त्यामुळे १९६२ मध्ये आमच्या देशाला चीनकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपले वजन असणे व हिंदुस्थानचा शब्द मानण्यात यावा, असे सैनिकी धोरण हिंदुस्थानने आखून हिंदुस्थानी सैन्याची पुनर्रचना, बांधणी करावी याबाबत स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमीच आग्रही होते. सावरकरांच्या सैनिकी धोरणाकडे देशाच्या तत्कालीन नेतृत्वाने आणि तथाकथित विचारवंतांनीही दुर्लक्षच केले.
संदर्भ : सामना