जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी सांगितलेले चंद्रभागा नदीचे माहात्म्य
अवघीच तीर्थे घडली एकवेळा ।
चंद्रभागा डोळा देखियला ॥
पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी ।
तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी ॥
आध्यात्मिक महत्त्व असलेल्या चंद्रभागा नदीची इतकी दुरवस्था होईपर्यंत प्रशासन काय करत होते ? हे इतकी वर्षे का लक्षात आले नाही ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
-
चंद्रभागेमध्ये गटाराचे पाणी, तर नदीच्या वाळवंटात जिकडेतिकडे शेवाळ आणि चिंध्या
पंढरपूर : शहरातील गटारांचे पाणी थेट चंद्रभागा नदीमध्ये जात असल्याने संतांनी गौरवलेल्या या नदीचे पावित्र्य नष्ट होत आहे. नदीचे पाणी अतिशय अस्वच्छ झाले असून नदीचे वाळवंट शेवाळ आणि (कपड्याच्या) चिंध्या यांनी व्यापल्याचे दयनीय चित्र सध्या दिसत आहे. सद्यस्थितीत चंद्रभागा नदीपात्राच्या ठिकाणी पुष्कळ अस्वच्छता असून तेथे दुर्गंध पसरला आहे. (शासनाने तीर्थक्षेत्री स्नानांच्या ठिकाणी गटाराचे पाणी सोडले जाणार नाही आणि अन्य ठिकाणी प्रक्रिया करूनच सांडपाणी नदीत सोडले जाईल, यासाठी तत्पर उपाययोजना करायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
पंढरपुरात आषाढी वारीची गर्दी वाढत असतांना पात्रात पुरेसे पाणी नाही आणि त्यात गटारांच्या पाण्याची त्यात भर पडत आहे. तिरावरील गटाराचे पाणी चंद्रभागेच्या वाळवंटात एका डबक्यामध्ये साठवले जाते. त्याची क्षमता संपल्यानंतर हे सांडपाणी थेट नदीपात्रात येते. गेली अनेक वर्षे हा प्रकार चालू आहे. आजवर अनेक विकास आराखडे आखण्यात आले आणि निधीही देण्यात आला; परंतु मिळालेला निधी नको तिथे खर्ची पडल्याने भाविकांना गटाराच्या पाण्याने स्नान करावे लागत आहे. त्यामुळे राज्यशासनाच्या नमामि चंद्रभागे प्रकल्पाचा आरंभ तात्काळ करावा, अशी मागणी वारकरी करत आहेत.
चंद्रभागा नदीचे पात्र आणि वाळवंट दोन दिवसांत स्वच्छ करणार ! – सोलापूर जिल्हाधिकार्यांचे आश्वासन
येथील चंद्रभागा नदीपात्रातील जलपर्णी, शेवाळ, अस्वच्छ पाणी, तसेच वाळवंट स्वच्छ करणार असून त्यासाठी स्वयंसेवी संघटनांचे साहाय्य घेतले जाणार आहे, असे आश्वासन सर्वच स्तरांतून येथील चंद्रभागेच्या पात्रातील अस्वच्छतेविषयी चर्चा व्हायला लागल्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिले
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात