या संदर्भात शासनाने त्वरित लक्ष देऊन पथकर रहित होण्यासाठी प्रयत्न करावेत !
सोलापूर : १५ जुलै या दिवशी असणार्या आषाढी यात्रेसाठी अनेक वारकरी पालख्यांसोबत पंढरपुरात येेतील. गत वर्षी शासनाने प्रमुख पालख्यांसमवेत येणार्या दिंडीतील वाहनांना पथकर भरावा लागणार नाही, असे घोषित केले होते; मात्र आषाढी तोंडावर आलेली असतांना या संदर्भातील कोणताच निर्णय शासनाने न घेतल्याने वारकरी-भाविक यांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.
पुण्यात आषाढी यात्रेच्या निमित्ताने झालेल्या नियोजनाच्या बैठकीत पुरवठामंत्री श्री. गिरीष बापट यांनी पथकर न लागण्याच्या संदर्भात पाठपुरावा करण्याची घोषणा केली होती. यावर बैठक होऊन घोषणा न झाल्यास त्याची अंमलबजावणी होणार काय, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आणि संतांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर येथे प्रतीवर्षी भरणार्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी देशभरातून लक्षावधी भाविक येतात. यात सुमारे २५ प्रतिशत भाविक पालखी सोहळ्याद्वारे पंढरपुरात येतात. त्यामुळे या सोहळ्यासमवेत असणार्या वाहनांना पथकरमुक्ती देणे आवश्यकच आहे.
गोरगरीब वारकर्यांना पथकर सवलत का नाही ? – ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज, सांगली
या संदर्भात सांगली जिल्हा वारकरी संप्रदाय सेवा मंडळाचे संस्थापक ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज म्हणाले, या दिंडीत सहभागी होणारा वारकरी हा गोर-गरीब-शेतकरी असतो. अशा वारकर्यांच्या वाहनासाठी शासन पथकरमाफी का देऊ शकत नाही ? एकीकडे शासन तीर्थयात्रा विकासासाठी कोट्यवधी रुपये देण्याची घोषणा करते आणि पथकरासाठी अत्यल्प असणारी सवलत देत नाही, असे का ? आवश्यकता भासल्यास तीर्थक्षेत्र विकासातील काही निधी याकडे वळवण्यात यावा. सध्याचे शासन हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे असल्याने त्यांनी वारकर्यांना पथकरमाफी देऊन वारकर्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात