मुंबई : ‘हिंदुत्व अामच्यासाठी महत्त्वाचे असून त्यापुढे सत्ता किंवा पदे दुय्यम आहेत. आम्ही प्रथम देशाचे नागरिक आहोत आणि म्हणूनच आम्हाला जे योग्य वाटते तेच बोलतो. चीन, जपान, मलेशियाप्रमाणे भारतातही लोकसंख्या धोरणे आणि कायदेही तयार केले पाहिजेत,’ असे परखड मत बिहारचे खासदार आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्त केले आहे. पक्षीय राजकारण ते सरकारची भूमिका अादी विषयांवर सिंह यांच्याशी दैनिक ‘दिव्य मराठी’ने साधलेला संवाद…
– राममंदिरासाठी अनेक वर्षांपासून विटा येत आहेत, परंतु देशाचे वातावरण बिघडवण्यासाठी अाताच असे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी असहिष्णुतेवरून वातावरण तापवण्यात आले होते. परंतु ज्यांनी वातावरण तापवले त्यांनी मुद्दाम एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले, ती म्हणजे आपला देशच खरा सहिष्णुतावादी आहे. असे नसते तर याकूब मेमनच्या फाशीच्या अर्जावर विचार करण्यासाठी मध्यरात्री न्यायालयाचे दरवाजे उघडले नसते. एका दहशतवाद्याला फाशी दिल्यानंतर मुंबईतील त्याच्या अंत्ययात्रेत प्रचंड गर्दी झाली नसती. काँग्रेसने देशाच्या विरोधी पक्षाची व्याख्याच बदलून टाकली आहे. गेल्या १८ महिन्यांत काँग्रेसने संसदेला बंदी बनवले आहे. त्यांना विकासावर चर्चा करायची नसून केंद्र सरकारची पदोपदी अडवणूक करायची आहे.
– अल्पसंख्याक म्हणून लाड करून घ्यायचे आणि देशाच्या मुळावरच उठायचे या प्रवृत्तीच्या विरोधात अाम्ही आहोत. काही भागांमध्ये अल्पसंख्याकांची संख्या ७० ते ८० टक्के आहे, मग त्यांना अल्पसंख्याक म्हणायचे का? खरे तर आता अल्पसंख्याकांची व्याख्या नव्याने तयार करण्याची आवश्यकता आहे. यासाठी लोकसंख्या धोरण तयार केले पाहिजे. याबाबत देशभर चर्चासत्रे झाली पाहिजेत. चीनने लोकसंख्या धोरण तयार केले आहे आणि आज विकास झालेला देश म्हणून तो पुढे आला आहे. मलेशिया, जपान, इंडोनेशियानेही असे धोरण तयार केले आहे. देशाला विकासाकडे न्यायचे असेल तर अशा धोरणाची आवश्यकता आहेच.