रियाध : सोमवारी मदिना येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्याप्रकरणी १२ पाकिस्तानी नागरिकांसह १९ जणांना अटक करण्यात आल्याचे सौदी अरेबियाच्या सरकारने जाहीर केले आहे. शियांच्या मशिदीजवळ करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये एकूण ७ जण ठार तर २ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नईर मोस्लेम हम्माद अल बलावी हा सौदी नागरिक या हल्ल्यांमागचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा हल्ला तिघा दहशतवाद्यांनी केला होता. जेद्दाह मध्ये झालेला हल्ला अब्दुल्ला कलझर खान या पाकिस्तानी व्यक्तिने केल्याचे तपासात आढळले आहे. ड्रायव्हर असलेला अब्दुल्ला गेली १२ वर्षे सौदीमध्ये आहे. मदिना येथे झालेल्या हल्ल्यात ४ जण ठार झाले होते. तर कातिफमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये ३ जण ठार झाले होते. या हल्ल्यांची अद्याप कुठल्याही दहशतवादी गटाने जबाबदारी घेतलेली नाही.
सौदी अरेबियावर हल्ले करण्याचे आदेश इसिसचा नेता अबू बकर अल बगदादी याने दिले असून त्यानंतर हे हल्ले झाले आहेत. सौदीमधले तरूण कट्टरतावादाकडे झुकत असून याबाबत सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी चिंता व्यक्त केली आहे.
संदर्भ : लोकमत