धर्मशिक्षणाच्या अभावामुळे शिवलिंगावर अन्य वनस्पती वहाण्याची हिंदूंकडून केली जाणारी अयोग्य कृती !
वेरूळ : येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराच्या गाभार्यात शिवलिंगावर बेल आणि फूल सोडून इतर वनस्पतींची पाने वहाण्यास प्रशासनाने ६ जुलैपासून बंदी केली आहे. पोलीस प्रशासन आणि भारतीय पुरातत्व विभाग यांना याची कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे. अशुद्ध दूध आणि इतर झाडांची पाने यांच्या वापराविषयी संभाजीनगर येथील डॉ. भांबरे यांनी संभाजीनगरच्या जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती.
त्या अनुषंगाने ५ जुलै या दिवशी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस तहसीलदार बालाजी शेवाळे, भारतीय पुरातत्व विभागाचे हेमंत हुकुरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड, श्री घृष्णेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष दीपक शुक्ला गुरु, डॉ. भांबरे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी सांगितले की, बेल आणि फुल यांचे विक्रेते भाविकांना इतर वनस्पतींचा पाला शिवलिंगाला वहाण्यासाठी विकत होते. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले होते, तसेच वाहिला जाणारा हा पाला एकदा वाहिल्यानंतर भाविकांना मंदिराच्या बाहेर पुन्हा विकला जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये बेल आणि फूल अर्पण करण्यास अनुमती आहे, तसेच दुग्ध आणि जलाभिषेकाच्या पूजाही चालू रहातील. दुग्धाभिषेकामध्ये चांगले दूध वापरले जावे. भेसळयुक्त दूध ज्योतिर्लिंगावर वाहिले जाऊ नये, अशाही सूचना उपस्थितांनी केल्या आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात