तिरुवनंतपुरम : तिरुवनंतपुरम येथे राहणाऱ्या बिंदुकुमार यांचा मुलगा एनएसजी कमांडो बनून देशाची सेवा करतो आहे, तर मुलगी ‘आयएस’च्या दहशतवाद्यांना जाऊन मिळाली आहे. यासाठी बिंदु कुमार यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
बिंदु यांनी रविवारी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची भेट घेतली आणि या प्रकरणाचा तपास करण्याची विनंती केली. ‘माझ्या मुलाला भारतीय लष्करात जायचे होते. त्यासाठी तो लहानपणापासून प्रयत्न करत होता. मात्र, विवाहानंतर इस्लाम धर्म स्वीकारणारी मुलगी ‘आयएस’च्या जाळ्यात कशी अडकली हे मलाही कळले नाही’, असे त्या म्हणाल्या. यासंदर्भात त्यांनी निवदेन मुख्यमंत्र्यांकडे दिले.
माझी मुलगी निमिषा तिच्या पतीसोबत १६ मे रोजी माहेरी आली होती. १८ मे रोजी तिने श्रीलंकेला जात असल्याचा फोन केला. त्यानंतर मी अनेकदा तिला विचारले की तू कुठे आहेस ? कुठून फोन करते आहेस ? पण, तिने काहीही सांगितले नाही. ४ जूनपर्यंत तिचे फोन येत होते. मात्र, त्यानंतर तिचा फोन आला नाही. ती गर्भवती असल्याने मला तिची अधिक काळजी वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या.
‘निमिषा महाविद्यालयात असताना एका ख्रिश्चन तरुणाशी तिचा संपर्क आला. त्यानंतर त्या दोघांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि नोव्हेंबर २०१५ मध्ये दोघांनी विवाह केला’, अशी माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिली.
पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, देशातील १७ जण ‘आयएस’ला जाऊन मिळाले आहेत. यात १० पुरुष तर ७ महिला आहेत. ‘आयएस’च्या जाळ्यात अडकलेल्यांमध्ये सर्वाधिक लोक केरळचे असून त्यात बिंदु कुमार यांची मुलगी असल्याचा पोलिसांना संशय आहे.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स