पणजी : उगे, सांगे येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानातील श्रींच्या मूर्तीवर ११ जुलै या दिवशी संशयित लुकास कार्व्हालो याने क्रॉस असलेली रोझरी माळ घातल्याचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी संशयित कार्व्हालो याला पडकलेले असले, तरी या घटनेमागे बोलवता धनी कोण आहे, हे पोलिसांनी शोधून काढले पाहिजे. उगे, सांगे येथील ग्रामस्थांनीही अशी मागणी केली आहे. यापूर्वी राज्यभरात आणि विशेषत: सांगे तालुक्यात मूर्तीभंजन आणि मंदिरांत चोर्या होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले होते आणि या प्रकरणी दोषींना पकडण्यास शासन आणि पोलीस यंत्रणेला पूर्णपणे अपयश आल्याचे सर्वश्रृत आहे.
श्री सिद्धेश्वर मंदिरातील श्रींच्या मूर्तीवर रोझरी माळ घालणे आणि मागे घडलेल्या मूर्तीभंजन अथवा मंदिरातील चोर्या या प्रकरणांमध्ये काही साम्य आहे का, याचाही शोध पोलीस यंत्रणेने घेणे आवश्यक आहे. श्री सिद्धेश्वर मंदिरातील घटना म्हणजे अल्पसंख्यांक नागरिक बहुसंख्य हिंदूंवर कसे अत्याचार करतात, याचे प्रातिनिधिक उदाहरण असून शासनाने एकगठ्ठा मतांकडे डोळा ठेवून या घटनेकडे दुर्लक्ष करू नये, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी आहे.