पंढरपुरात निवडक अभंग निरूपणच्या ३० व्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न !
पंढरपूर : सनातन संस्था हिंदु धर्माचा प्रचार प्रसार करणारी एकमेव संस्था आहे. या संस्थेवर बंदी घातल्यास हिंदु धर्माची मोठी हानी होणार असून सनातन संस्थेवर बंदी म्हणजे हिंदु धर्मावर बंदी घालण्यासारखे आहे. वारकरी संप्रदाय आणि सनातन संस्था यांनी एकत्रित कार्य केले आहे. सनातन धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य ही संस्था करत आहे. सध्याच्या शासनाला वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटना यांनी अथक प्रयत्न करून सत्तेवर आणले आहे.
वेळ पडलीच, तर सनातनसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आल्यास वारकरी संप्रदाय सर्वांत पुढे असेल. अशा धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी संघटनेवरील बंदी खपवून घेतली जाणार नाही, अशी चेतावणी ह.भ.प. भगवान महाराज कोकरे यांनी येथील सोहळ्यात दिली.
या वेळी उपस्थित वारकर्यांनी सनातन संस्थेवर बंदी घालू नये, आम्ही सनातनच्या पाठीशी आहोत, या ठरावाला हात उंचावून अनुमोदन दिले.
ह.भ.प. अनिल महाराज बडवे या वेळी म्हणाले, वैदिक संस्कृती आणि वारकरी संप्रदाय यांचे अतुट नाते आहे. वैदिक संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य सनातन करत आहे. यामुळे अशा संस्कृती धर्माचे रक्षण करणार्या संस्थेवर बंदी आणू नये.
सूत्रसंचालन करतांना ह.भ.प. प्र.दि. कुलकर्णी म्हणाले, सनातन संस्थेचे कार्य अत्यंत चांगले आहे. अशा सनातन संस्थेवर बंदी घालणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार होय.
वै. गुरुवर्य श्रीधुंडा महाराज देगलूरकर जगद्गुरु श्रीतुकाराम महाराज गाथा निवडक अभंग निरूपण या ग्रंथाचा प्रकाशन सोहळ हरिदास वेस येथे पार पडला. पंढरपूरचे ह.भ.प. मुरलीधर धूत महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त ह.भ.प. बाळासाहेब महाराज हरिदास, ह.भ.प अनिल महाराज बडवे, ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर, गुरुराज महाराज देगलूरकर, कोल्हापूरचे ह.भ.प. बाळू महाराज ऊर्फ भानुदास महाराज यादव, ह.भ.प. बाबूराव महाराज वाघ, ह.भ.प. डॉ. चालीकवार महाराज, ह.भ.प. भगवान महाराज, ह.भ.प. रामचंद्र महाराज तेलूरे, चिपळूणचे ह.भ.प. भगवान महाराज, ह.भ.प. महेश महाराज, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे उपस्थित होते.
वै. गुरुवर्य श्रीधुंडा महाराज देगलूरकर यांच्या मुखातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज गाथा ओळन्ओळ अक्षरबद्ध करून सार स्वरूपात आणि आशयबद्ध लिखाण ह.भ.प. मुरलीधर महाराज धूत यांनी करून समाजाला उपकृत केले आहे आणि त्यांच्या हातून केवळ तीसच दिवस नव्हे, तर ३६४ हून अधिक म्हणजेच प्रतिदिन लिखाण व्हावे आणि यासाठी बळ मिळावे, असे विचार ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी या वेळी व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात