सोलापूर : सोलापुरातील ६० जण श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय संस्थेकडून अमरनाथ यात्रेसाठी १९ जून रोजी सोलापुरातून रवाना झाले होते़. हे सर्वजण १४ जुलै रोजी अमरनाथ येथील शिवलिंगाचे दर्शन घेऊन १५ जुलै रोजी दुपारी सोलापूरकडे येण्यास निघाले होते. काश्मीरपासून काही अंतरावर असलेल्या नागमणी गुंज या गावाजवळील पेट्रोलपंपाजवळ दीडशे ते दोनशे तरूणांनी या परिसरात गोंधळ घालण्यास सुरूवात केली़ यावेळी त्यांच्या हातात काठ्या, तलवारी होत्या़ काश्मीर जिंदाबादच्या घोषणा देत वानी हमारा मरा नही वो शहीद हुआ हैं चा नारा देत दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरूवात केली़. काही वेळाने जोरदार पावसाने सुरूवात केली़ विजेचा कडकडाट सुरू झाल्याने त्या तरूणांनी या परिसरातून पळ काढला़ जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आलेल्या तरुणांच्या कचाट्यातून वाचल्याने सोलापुरातील ६० भाविकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ अशी माहिती प्रत्यक्षदर्शी ह.भ.प निवृत्ती कांबळे यांनी दिली़.
हिजबुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर बुरहान वानी याला चकमकीत ठार केल्यानंतर काश्मिरात भडकलेल्या हिंसक आंदोलनाचा सगळ्यात मोठा फटका अमरनाथ यात्रेकरूंना बसला आहे़ या यात्रेसाठी गेलेल्या सोलापुरातील काही यात्रेकरूंच्या गाड्यांवर दगडफेक केली़.
बुरहान वानी हा दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता़ हा चकमकीत ठार झाला़ वानीला ठार केल्याच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी जम्मू-काश्मीर पेटवले होते. काश्मीरमध्ये ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक करून अशांतता माजविण्याचा प्रयत्न केला़ या हिंसाचारात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झालाय़ खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने अमरनाथ यात्रा स्थगित केली आहे पण दहशतीच्या वातावरणात यात्रेकरूंना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय अशी खंत ह.भ.प निवृत्ती इंगळे महाराज यांनी बोलून दाखविली़.
यात्रेकरूंच्या असहायतेचा फायदा घेऊन हॉटेलवाल्यांनी खोल्यांचे आणि जेवणाचे दर प्रचंड वाढविले़ यावेळी आमच्यासोबत असलेल्या यात्रेकरूंनी स्थानिकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला पण तेही रागाने बोलून मदत करण्यास नकार दिला़ अमरनाथहून सोलापूरला परत येत असताना आम्ही जिवंत येतो की नाही याची शाश्वती नव्हती, मात्र देवाच्या कृपेने आम्ही बचावलो असल्याची भावना निवृत्ती इंगळे महाराज यांनी बोलून दाखविली़.
संदर्भ : लोकमत