नागपूर : शांतीसाठी धर्माची आवश्यकता असून धर्म पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असेल, तर सर्व शिक्षा अभियानाच्या धर्तीवर धर्मशिक्षण देण्याची चळवळ हाती घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कांचीकामकोटी पिठाचे शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वतीजी महाराज यांनी येथे केले. श्री शिवशक्तीपीठ सेवा समितीच्या वतीने रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय विश्व स्वधर्म संमेलनात ते बोलत होते. शंकराचार्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या संमेलनाचे उद्घाटन केले आणि त्याद्वारेच उपस्थितांना संबोधित केले.
या वेळी व्यासपिठावर स्वामी स्वरूपानंद, हार्दिक स्वामी, अनंतशेष प्रभू, मोहन महाराज कठाये, दत्ता महाराज जोशी, ज्योतिष्याचार्य दादा वाणी, खासदार कृपाल तुमाने, श्रीरामपंत जोशी, कृष्णाशास्त्री आर्वीकर, ज्ञानसाधू वासुदेवराव चोरघडे, श्रीमंत राजे रघूजी भोसले, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, वनराई फाउन्डेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, आमदार गिरीश व्यास उपस्थित होते.
शंकराचार्य पुढे म्हणाले, माणूस शाश्वत नाही, पण धर्म शाश्वत आहे. धर्माचा उच्चार करायला संकोच बाळगण्याची आवश्यकता नाही. धर्माप्रती श्रद्धेची आवश्यकता आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात