नवी मुंबई : बांगलादेशमधील दहशतवादी हल्ल्यानंतर चर्चेत आलेले इस्लामचे धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक यांच्या सहकाऱ्याला तरुणांना इसीसमध्ये भरती केल्याप्रकरणी केरळ आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी आर्शीद कुरेशी नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. तो डॉ. नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. आर्शीदला सीवूड्समधील फ्लॅटवर छापा टाकून अटक करण्यात आली. सीबीडी-बेलापूरमधील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर त्याला चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक आर्शीद कुरेशीची चौकशी करणार असून त्यानंतर त्याला केरळमध्ये नेण्यात येणार आहे.
केरळमधून अलिकडेच बेपत्ता झालेल्या तरुणांपैकी मरिअम आणि तिचा पती बेस्टीन विन्सेटचा समावेश होता. मरिअमच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार इस्लामध्ये धर्मांतरण करून इसीसमध्ये भरती होण्यासाठी त्याच्यावरही जबरदस्ती करण्यात आल्याचे सांगितले. धर्मांतरणासाठी जबरदस्ती करणाऱ्यांमध्ये बेस्टीन आणि आर्शीद कुरेशीचा सहभाग असल्याचेही त्याने सांगितले.
संदर्भ : सकाळ