ब्राझील पोलिसांनी रिओ ऑलिम्पिक खेळांवर दहशतवादी हल्ला करण्याच्या बेतात असलेल्या दहा संशयितांना अटक केली आहे. पुढच्या महिन्यात रिओ- दि- जेनेरिओ या शहरात ऑलिम्पिक खेळाला सुरूवात होत आहे.
या सामन्यांवर दहशतवादाचे सावट आहे. या दहा जणांचा गट इसिस या दहशतवादी संघटनेने प्रभावित असल्याचे समजते आहे. पोलिस आता या दहा जणांची कसून चौकशी करत आहेत. यांचे संगणक आणि मोबाईल फोन देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या मते हा गट बंदुकीची ऑनलाईन खरेदी करत होता. पोलिसांच्या अटकेत असलेले दहाही जण ब्राझीलचेच रहिवाशी आहेत. या दहाही जणांनी हल्ल्याचे कोणतेही पूर्वनियोजन न केल्याचेही समजेत. केवळ बंदुका घेऊन गोळीबार करायचा इतकेच यांच्या नियोजनात होते अशीही माहिती पोलिसांनी दिली.
५ ऑगस्टपासून ऑलिम्पिक खेळाला सुरूवात होत आहे. जिहादी गटांकडून या खेळाला लक्ष्य केले जाण्याच्या धमक्या सतत येत आहेत. या धर्तीवर ब्राझीलमधली सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. विमानतळावर येणा-या प्रत्येकाची कडक तपासणी केली जात आहे. गेल्याच महिन्यात ब्राझील पोलिसांनी काही प्रात्यक्षिके घेऊन दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली होती. दहशतवादी हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी ब्राझील पोलीस पूर्णपणे तयार आहेत असा दावा देखील येथील सुरक्षायंत्रणेने केला आहे.
संदर्भ : लाेकसत्ता