मलेशियामध्ये हिंदु मंदिरांवरील आक्रमणात वाढ झाल्याचे प्रकरण
जिथे भारतातीलच हिंदूंची मंदिरे असुरक्षित आहेत, तिथे जगभरातील हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण कसे होणार ?
कुआलालुंपूर – मलेशियामध्ये हिंदु मंदिरांवरील आक्रमणात वाढ झाली आहे. यामध्ये आतंकवादी संघटनांचा हात असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर मलेशियातील हिंदु मंदिरांना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी मलेशियातील स्वयंसेवी हिंदु संघटनांनी केली आहे. मलेशियाचे गृहमंत्री अहमद जहिद हमिदी आणि पोलीस महानिरीक्षक खलीद अबू बकर यांची भेट घेऊन मंदिरांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती रपट या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कायदेशीर सल्लागार एम्. मनोगरन् यांनी कुआलालुंपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. (मलेशियातील हिंदूंच्या मंदिरांवर वाढत असलेल्या आक्रमणांच्या विरोधात केंद्रसरकारने मलेशियाच्या सरकारला जाब विचारावा, अशी भारतातील हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मलेशियातील हिंदु समुदायाकडे मंदिरांना सुरक्षा पुरवण्यासाठी निधी अपुरा पडतो. त्यामुळे यापुढेही मंदिरांवर आक्रमण होण्याची शक्यता आहे, असे मलेशियातील एका हिंदु संघटनेचे महासचिव जी. गुणराज यांनी सांगितले.
मलेशियाच्या पेनांग राज्यामध्ये गेल्या २ मासांत हिंदूंच्या ४ मंदिरांवर आक्रमण करण्यात आले. तसेच केडाह आणि पेराक येथेही हिंदु मंदिरांवर आक्रमण करण्यात आले. हिंदु मंदिरांवरील या आक्रमणांची चौकशी करण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी रपटचे अध्यक्ष ए. राजरेटिनम् यांनी केली आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात