मुंबई : दहशतवादाशी संबंधित आरोपांसंदर्भात ताब्यात घेण्यात आलेल्या रिझवान खान आणि आर्शिद कुरेशी या दोघांनी देशातील किमान ८०० नागरिकांचे धर्मांतर करुन त्यांना मुस्लिम धर्माची दीक्षा दिल्याचे दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे. यांमध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील बहुसंख्य नागरिकांचा समावेश आहे.
खान व कुरेशी हे दोघेही मुस्लिम विचारवंत झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेशी संबंधित आहेत. खान याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या काही कागदपत्रांमधून ही बाब उघडकीस आली. आपण “विवाह संस्था‘ (मॅरेज ब्युरो) चालवित असून यांमधील कुठलेही धर्मांतर बळजबरी घडविण्यात आले नसल्याचा दावा खान याने केला आहे. मात्र एटीसच्या अधिकाऱ्याने हे दोघेही अत्यंत मोठ्या स्तरावर धर्मांतर घडविण्याच्या प्रयत्नांत असल्याचे म्हटले आहे.
धर्मांतर करण्यासाठी या दोघांनी प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थी व तुरुंगांमधील कैद्यांना लक्ष्य केले होते. विद्यार्थी व कैदी या दोघांना कायदेशीर व आर्थिक मदत देऊन धर्मांतर घडविले जात असे. हा एक अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचे एटीसच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
संदर्भ : सकाळ