हिंदू धर्मात स्वयंभू मूर्ती असलेल्या देवदेवतांच्या मंदिरांची संख्या खूपच आहे. स्वयंभू मूर्ती म्हणजे कोणत्याही शिल्पकाराने न बनविलेली व नैसर्गिक रित्याच देवाच्या अवतारात सापडलेली मूर्ती. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले कनिपकल विनायक मंदिर हे असेच स्वयंभू गणेश मूर्ती व अनेक आख्यायिका असलेले मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे.
चोल वंशाच्या राजाने ११ व्या शतकात हे मंदिर बांधल्याचे मानले जाते. त्याचा विकास विजयनगरच्या राजाने १३३६ मध्ये केला आहे. ईश्वर आहे याची साक्ष देणारी रोचक कथा या मंदिराबाबत सांगितली जाते. ती अशी, या गावात तीन भाऊ राहात होते त्यातील एक आंधळा, एक बहिरा व एक मुका होता. त्यांचा उदरनिर्वाह छोट्याशा शेताच्या तुकड्यावर होत होता पण एकदा त्यांच्या विहीरीतले पाणी आटले. तेव्हा विहिर आणखी खणावी म्हणून एक भाऊ आत उतरला. तेथे खाेदकाम करताना एका दगडी मूर्तीवर त्याच्या पहारीचा घाव बसला व मूर्तीतून रक्त येऊ लागले. पाहता पाहता रक्त मिसळल्याने या विहीरीचे पाणी लाल झाले. त्याचवेळी या तीनही भावांचे अपंगत्व दूर झाले.
त्यानंतर गावकर्यांनी या गणेशमूर्तीला पाण्याबाहेर काढून तिची पूजा केली. तेव्हापासून ही विहीर कधीच आटली नाही. येथे सापडलेल्या गणेश मूर्तीचा आकार दिवसेदिवस बदलतो आहे तसेच या मंदिरात येऊन विहीरीकडे तोंड करून गणेशाची शपथ घेऊन वादांचा निवाडा केला जातो. म्हणजे गणेशाची शपथ घेईल त्याचा पक्ष खरा मानला जातो. येथे अट्टल गुन्हेगारही विहीरीतील पाण्यात स्नान केल्यानंतर गुन्ह्याची कबुली देतात व पाप मुक्त होतात. या गावात न्यायाची ही पद्धत कायद्यापेक्षाही अधिक महत्त्वाची व खात्रीशीर मानली जाते.
संदर्भ : माझा पेपर