बुलंदशहर (उत्तर प्रदेश) – अयोध्येमध्ये राममंदिर उभे करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे.
मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना शर्मा म्हणाले, “अयोध्येमध्ये लवकरात लवकर राममंदिर उभारावे ही देशवासियांची इच्छा आहे. याबाबत आम्ही न्यायालयाच्या आदेशाचे पालन करू किंवा मंदिर उभारण्याबाबत परस्पर सहमतीने सर्वमान्य निर्णय घेऊ. त्यामुळेच वेळ लागत आहे‘. तसेच भारतीय जनता पक्ष राममंदिर उभारण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याचेही शर्मा म्हणाले. दरम्यान पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहनही शर्मा यांनी यावेळी केले. राममंदिराशिवाय अयोध्येमध्ये भव्य संग्रहालयही उभारण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
स्त्रोत : सकाळ