मुंबई : शिवसेनेने सतत हिंदुत्वाची कास धरली. आम्ही हिंदुत्वासाठी आक्रमणे सहन करायची, संकटे अंगावर घ्यायची आणि इतरांनी मात्र मजा मारायची. हे किती काळ चालणार ? सरकार पालटले; पण सर्वसामान्यांचे आयुष्य पालटले का ? त्यासाठी काय करणार आहात ? आपल्या देशाला एक काहीतरी मार्ग आता स्वीकारावाच लागेल. तो जर का स्वीकारायचा असेल, तर या देशाला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्याव्यतिरिक्त दुसरा तरी पर्याय नाही. हे निधर्मीवादाचे चोचले आता खूप झाले. निधर्मीवादातून हिंदूंवरच अन्याय झालेला आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी परखडपणे हिंदु राष्ट्राची मागणी केली. श्री. ठाकरे यांची दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत दैनिक सामनामधून २४ जुलैपासून क्रमशः प्रसिद्ध होत आहे. त्यात श्री. ठाकरे यांनी वरील प्रतिपादन केले आहे.
श्री. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतील मांडलेली काही सूत्रे
१. सध्या देशामध्ये धुक्यासारखे वातावरण आहे. नक्की काय चालले आहे, तेच कळत नाही. नक्की कोण काय करत आहे, तेच कळत नाही आणि कारभार कोण करत आहे तेही कळत नाही.
२. इथेही पाकड्यांना अंगावर घेणारी शिवसेनाच आहे. पाकिस्तानचे कलाकार आले, क्रिकेटपटू आले, कुणी पुढारी आले की, आजही फक्त शिवसेनाच त्यांना विरोध करते. पाकिस्तान हा काही एकट्या शिवसेनेचाच शत्रू नाही.
३. काश्मीरमध्ये जे काही हिंदू मेलेत, ते आमच्या सारखे रक्तामांसाचे आहेतच. बाकी इतर राजकीय पक्षांतील हिंदू काय करत आहेत ? कि त्यांना हिंदू म्हणवून घ्यायची लाज वाटते ? मी म्हणेन अतिरेक्यांना दम भरण्यासाठी तरी या देशातील हिंदू एक होणार आहेत कि नाही ?
४. ज्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरसाठी प्राणत्याग केले, त्यांच्या विचारांचे सरकार जम्मू-काश्मीर आणि केंद्रात असतांना हे सर्व घडते याचे वाईट वाटत आहे.
५. जो हिंदु हित की बात करेगा वो ही देश पे राज करेगा, अशीसुद्धा घोषणा होती. मग हे सर्व लोक कुठे गेले ? अयोध्येमध्ये मंदिर होईल तेव्हा होईल; पण अमरनाथमध्ये आपले एक मंदिर आहे. त्या मंदिराची आपली यात्रा आहे. यात्रा जर आतंकवाद्यांमुळे बंद पडत असेल, तर हे दायित्व नेमके घ्यायचे कोणी ?
६. जर हिंदुत्व बाळगणे हा आपल्या देशात गुन्हा ठरवला जात असेल, तर मग निधर्मीपणाच्या विषयीतरी पक्षपात करू नका. सर्वधर्मसमभाव लागू करून कारभार केला, तरी काश्मीरातील अमरनाथ यात्रा तुम्हाला चालू ठेवावीच लागेल. पण ना धड हिंदुत्व आणि ना धड निधर्मीपणा अशा कात्रीत आपण अडकलो आहोत.
७. हिंदुत्वावर संकट आले की एका बेधडकपणाने शिवसेनाप्रमुख ते आपल्या डोक्यावर घेत होते आणि सर्व हिंदूंना दिलासा देत होते. ही संकटे शिवसेनाप्रमुखांनी अंगावर घेतली आणि बाकीच्यांनी मात्र हिंदुत्व-हिंदुत्व करत सत्तेची झूल अंगावर घेतली. हा जो फरक आहे तो मोठा आहे.
इसिसच्या आतंकवाद्यांना सोडून सनातनच्या मागे का लागता ? – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदूंवर ठरवून अन्याय होत असतांना हे सर्व निधर्मी वगैरे स्वत:चे ऊर बडवणारे लोक कुठे गेले ? सनातन या संस्थेविषयी जो प्रकार चालू आहे तो साप समजून भुई धोपटण्याचाच प्रकार वाटत नाही काय ? इथे सनातनची बाजू घेण्याचा प्रश्न नाही; पण त्यांच्यावर जे आरोप चालू आहेत, त्याचा एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावा. एक तर तुम्ही खटला चालवायला सिद्ध नाही आणि सत्य समोर येऊ देत नाहीत. त्यांनी केले कि नाही केले ? तुम्ही जो त्यांच्यावर ठपका ठेवत आहत त्यात ते सहभागी आहेत कि नाही ? कि फक्त तुम्ही बेलगामपणाने बोलत बसायचे. हा काय न्याय म्हणायचा ? शिवसेनाप्रमुखांचीसुद्धा हीच भूमिका होती. जर एखाद्यावर गुन्हा सिद्ध झाला, तर त्याला जे असेल ते कठोर शासन करा; पण फक्त संशयाने त्याला उद्ध्वस्त करू नका. परभणीतही इसिसचे कार्यकर्ते सापडले. त्यांना रोखण्याचे काम कोणाचे आहे ? ते विध्वंस घडवण्याचे शिक्षण घेऊन आले. ते शिक्षण देणारे कोण ? कुठून ? या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही नको त्याच्या मागे का लागता ? आणि मागे लागलाच आहात, तर तो विषय कायमचा संपवत का नाही ?
धर्मांध मुसलमानांविषयी कोणीच बोलत नाही !
तुम्हाला हिंदुत्ववाद जेवढे भयानक, खतरनाक वाटते तेवढे धर्मांध मुसलमान, त्यांचे चाळे खतरनाक का वाटत नाहीत ? कोणत्याही धर्मावर माझा आक्षेप नाही; पण जे सापडले जातात, त्यांच्यावरती तुम्ही एक अक्षरही का बोलत नाही ? ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत हिंदुत्वाचा द्वेष केला आहे, त्यातील किती जणांनी या इस्लामिक स्टेटवाल्यांचा धिक्कार केला आहे ? अमरनाथ यात्रेकरूंना ज्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे, त्याच्यावरती हे का नाही बोलत ?
काँग्रेसच्या काळाप्रमाणेच आताही घडत आहे !
काँग्रेस राजवटीत हे प्रकार नेहमीच घडले; पण आजच्या राजवटीतही तेच घडावे, हे आश्चर्यकारक म्हणण्यापेक्षा दु:खदायक आहे; कारण या देशात अजूनही हिंदू बहुसंख्यांक आहेत आणि त्यांनाच चिरडले जात आहे. त्यांनीच एका आशेने, एका विश्वासाने सरकार पालटल्यानंतर देशाच्या नशिबी चांगले घडेल, असे वाटत असतांना मागील पानावरून पुढे चालू असेच घडते आहे.
पंतप्रधान काश्मीरमध्ये जाऊन हिंदु बांधवांच्या मागे ठामपणे का उभे रहात नाहीत ?
अब हिंदु मार नहीं खाएगा ! ही गर्जना करणार्यांचे राज्य देशात आणि जम्मू-काश्मीरातही आहे; पण हिंदु संकटातच आहे. काश्मीर खोर्यात अमरनाथ यात्रेकरूंवर आक्रमणे झाली. सैनिक, पोलीस मारले गेले. सरकार पालटल्यावर हे चित्र पालटेल, अशी अपेक्षा होती. निवडणुका आल्यावर पंतप्रधान काश्मीरमध्येही गेले होते. तेच पंतप्रधान आज काश्मीरमध्ये जाऊन आपल्या हिंदु बांधवांच्या मागे ठामपणे का उभे रहात नाहीत ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात