काश्मिरी हिंदूंचे आठवे विस्थापन आणि संपूर्ण भारताच्या इस्लामीकरणाच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा उद्घोष !
कर्नूल (आंध्रप्रदेश) : भारतभरात उभारण्यात आलेल्या सहस्रो मशिदींना अनधिकृतरित्या पैसा पुरवला जातो. त्यासाठी शेकडो मंदिरांना पाडण्यात येते. अशा मशिदी आणि मदरसे यांच्या माध्यमातून धर्मांध मुसलमान संघटनांचे कार्य फोफावत चालले आहे. परिणामी समाजात कट्टरतावाद आणि जिहादी मानसिकता यांचा तीव्र गतीने प्रसार होत आहे. काश्मीरमधील हिंसाचार, अमरनाथ यात्रेवरील आक्रमण आणि हिंदूंचा होत असलेला वंशविच्छेद हा या सगळ्याचा परिपाक आहे, असे कणखर प्रतिपादन श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले. पनून कश्मीरसह भारतभरातील १६० हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ संघटनांच्या पुढाकाराने काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी एक भारत अभियान – कश्मीर की ओर नावाची मोहीम चालू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत कर्नूल येथे २४ जुलै या दिवशी एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी श्री. प्रमोद मुतालिक प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या राष्ट्रव्यापी मोहिमेच्या अंतर्गत ही चौथी सभा होती.
शिवसेना तेलंगण-आंध्रप्रदेश, श्रीराम सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित या सभेत श्री. मुतालिक पुढे म्हणाले, भारत सरकार आणि देशभरातील खासदार यांनी हिंदूंच्या पलायनाची माहिती देशाला दिलेली नाही, हे लज्जास्पद आहे. पाकपुरस्कृत आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी त्याचे स्रोत असलेल्या पाकलाच नष्ट करायला हवे. त्यानेच जग शांत होईल. त्यासाठी नुसती चर्चा करण्याचे सोडून पाकला कणखर प्रत्युत्तर द्यावे लागेल. आम्हा हिंदूंचा मोदींवर विश्वास होता की, ते गोहत्या रोखतील, राम मंदिर बांधतील, ३७० कलम रहित करतील आणि लव्ह जिहादला आळा घालतील; परंतु त्यांनी आतापर्यंत या संदर्भात काहीच केलेले नाही. त्यांना दुसर्यांदा विजयी होण्यासाठी हिंदूंची मते हवी असतील, तर हिंदूंच्या या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. १०० कोटी हिंदूंच्या देशात त्यांचे आराध्य प्रभु श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर अयोध्येत बांधता न येणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे.
खरे शिवसैनिकच हिंदु राष्ट्राची स्थापना करतील ! – श्री. टी.एन्. मुरारी, राज्य अध्यक्ष, शिवसेना तेलंगणा – आंध्रप्रदेश
श्रीरामाची लाकडी मूर्ती आणि रावणाची सोन्याची मूर्ती यात जो श्रीरामाची मूर्ती निवडेल, तोच खरा शिवसैनिक ! असे शिवसैनिकच हिंदु राष्ट्राची स्थापना करतील. शिवसेनेचे भारत सरकारला कळकळीचे आवाहन आहे की, सरकारने काश्मीरसह संपूर्ण देशाच्या इस्लामीकरणाच्या विरोधात वेळेत पावले उचलायला हवीत. अन्यथा पाकिस्तान, अफगाणिस्तान, सिरिया अथवा इराक यांसारखे इस्लामी राज्य पहाण्याची आपल्यावर पाळी येईल. भारत सरकारने त्याच्या डोळ्यांवरील झापडे काढून काश्मीरमध्ये डोके वर काढू पहाणार्या धर्मांधांच्या विरोधात, तसेच एकूणच संपूर्ण देशाला गिळंकृत करू पहाणार्या जागतिक जिहादाच्या विरोधात सतर्क होण्याची आवश्यकता आहे. काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, इंडियन मुजाहिदीन यांसारख्या जिहादी संघटनांचे आतंकवादी दिवसाढवळ्या फिरतात. काश्मीरमधील न्याय, सुव्यवस्था आणि लोकशाही व्यवस्थेला हे आव्हान आहे.
काश्मिरी पंडितांचे पलायन हे भारतभरातील सर्वच हिंदूंसाठी आव्हान ! – श्री. राहुल कौल, राष्ट्रीय समन्वयक, युथ फॉर पनून कश्मीर
गेल्या शेकडो वर्षांत काश्मीरमधून हिंदूंचे ७ वेळा पलायन झाले. आता होत असलेल्या पलायनाची ही ८ वी वेळ आहे. आज आपण याकडे दुर्लक्ष केले, तर उद्या ही वेळ कर्नूलमधील हिंदूंवर यायला वेळ लागणार नाही. उत्तरप्रदेशमधील कैरानाचे सत्य आपण जाणताच ! त्यामुळे सर्व हिंदूंनी १९ जानेवारी २०१७ या दिवशी काश्मीरमध्ये जाण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे. काश्मीरला दुर्दशेतून बाहेर काढायचे असेल, तर भारत सरकारला हे लक्षात घ्यायला हवे की, तेथील व्यवस्था इस्लामी धर्मांधांनी त्यांच्या नियंत्रणात घेतली आहे. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, काँग्रेस आणि भाजप या सर्व राजकीय पक्षांनी फुटीरतावाद आणि इस्लामी धर्मांधता यांकडे दुर्लक्ष करून या सूत्रांना काश्मिरी राजकारणाचा अविभाज्य भाग बनवला. तेथील सरकारने फुटीरतावाद्यांसमवेत केलेली युती (अजेंडा ऑफ अलायन्स) ही हिंदूंच्या सर्व आशा धुळीस मिळवणारी असून काश्मीरला हातातून घालवण्यासाठी ते एक घातक पाऊल सिद्ध होणार आहे.
श्री. कौल यांनी या वेळी काँग्रेस आणि भाजप या पक्षांना चेतावणी देत म्हटले, काश्मीरमधील असंतोष धार्मिक कट्टरतेतून होत आहे, हे लपवण्याचे काम सोडून द्यायला हवे. काश्मीरमधील जिहादी युद्ध येथील राजकारणापेक्षा वरचढ झाले आहे, हे दुर्दैवी आहे.
२६ जानेवारी २०१७ ला हिंदू काश्मीरमध्ये भारताचा ध्वज फडकवतील ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
काश्मीरमध्ये आपल्या राष्ट्रध्वजाला विरोध होतो, याचा आम्ही निषेध करतो. तसेच पुढील वर्षी २६ जानेवारीला असलेल्या प्रजासत्ताक दिनी काश्मीरमध्ये आम्ही भारताचा ध्वज फडकवू. काश्मीरमध्ये चालू झालेला आतंकवाद आज भारतभरात सर्वत्र पसरत आहे. त्यामुळे आम्ही काश्मीरमध्ये जाऊन राष्ट्रनिष्ठेचा प्रसार करू. देशभरातील हिंदूंना १९ जानेवारी २०१७ ला आम्ही काश्मीरमध्ये घेऊन जाणार. काश्मीर, केरळ आणि अन्य राज्यांमध्ये फोफावलेल्या जिहादी आतंकवादाच्या विरोधात भारत सरकारने तत्परतेने सतर्क होणे हे अत्यावश्यक झाले आहे. जमात-ए-इस्लामी, अल्-ए-हदीस यांसारख्या धर्मांध मुसलमानी संघटनांना भारतातील बलाढ्य राजकीय पक्षांनी या ना त्या पद्धतीने संरक्षण दिले आहे. विविध सरकारांची अनेक धोरणे अशा संघटनांच्या पालन-पोषणास कारणीभूत आहेत. फुटीरतावाद्यांना आंतरिक प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला गेल्याने अनेक वेळा राजकीय पक्ष आतंकवादासाठी या फुटीर गटांचे अप्रत्यक्ष प्रायोजकत्व करत असल्याचे लक्षात येते.
जर मक्का-मदिन्यात श्रीराम मंदिर बांधता येत नसेल, तर अयोध्येत मशीद उभी होऊ देणार नाही ! – श्री. प्रमोद मुतालिक
एका पत्रकाराने प्रमोद मुतालिक यांना विचारले की, अयोध्येत राममंदिराशेजारी मशीद उभी करण्यात काय अडचण आहे ? यावर मुतालिक म्हणाले, काही अडचण नाही. केवळ मक्का-मदिन्यात त्यांच्या मुख्य मशिदीशेजारी हिंदूंना राम मंदिर उभे करू द्यावे. त्यावर सदर पत्रकाराने हे कसे काय शक्य आहे, ते त्यांचे स्थान आहे, असे म्हटले. यावर मुतालिक उत्तरले, जर तेथे मंदिर होऊ शकत नाही, तर अयोध्येत मशीद होऊ शकत नाही. आम्ही हिंदू आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत राम मंदिराशेजारी कोणालाही मशीद बांधू देणार नाही.
काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात भारत सरकारने श्वेतपत्र काढावे ! – पनून कश्मीरची मागणी
या वेळी राहुल कौल यांनी भारत सरकारकडे मागणी केली की, काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात सरकारने एक श्वेतपत्र काढावे. तसेच हिंदूंच्या वंशविच्छेदाचा, तसेच राज्यशासन आणि केंद्रशासन यांच्याकडून वंशविच्छेदाला सातत्याने नाकारण्यात येण्याच्या भूमिकेचा तपास करण्यासाठी एक विशेष अन्वेषण पथकाची स्थापना करण्यात यावी. यातूनच केंद्रसरकारचे भारतीय नागरिकांविषयी असलेले दायित्व आणि पालकत्व सिद्ध होऊ शकेल.
क्षणचित्र
या वेळी सनातनच्या इंग्रजी भाषेतील करेक्ट मेथड ऑफ कुकिंग अ मील (अन्न बनवण्याची योग्य पद्धत कोणती ?) या ग्रंथाचे हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले.
एक भारत अभियान – कश्मीर की ओर या मोहिमेविषयी काही … !
भारतभरातील हिंदूंनो, संघटित होऊन आपल्या काश्मिरी बांधवांच्या न्याय्य अधिकारांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा !
केंद्रसरकारने विस्थापित काश्मिरी हिंदूंविषयी त्वरित निर्णय घ्यावा, या मागणीसाठी विस्थापित काश्मिरी हिंदूंकडून १९ जानेवारी २०१७ या दिवशी चलो कश्मीर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ संघटनांनी एक भारत अभियान – कश्मीर की ओर या राष्ट्रव्यापी जागृतीपर मोहिमेस आरंभ केला आहे. या अंतर्गत हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी भारतभरात ८० सभा घेण्यात येणार असल्याचे ठरले आहे. त्यातील कर्नूल येथे झालेली सभा चौथी सभा होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात