Menu Close

१ सहस्र एकर शेतजमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या भ्रष्ट कारभाराचे नमुने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) चौकशीत बाहेर येण्यास आरंभ !

कोल्हापूर – पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची शाहूवाडी तालुक्यातील १ सहस्र एकर शेतजमीन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचे पुणे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडीच्या) चौकशीत निष्पन्न झाले आहे. चौकशीमध्ये हा प्रकार पुढे येताच त्यासंबंधीचा लेखी अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केल्याचे अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. (या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करण्याचे आदेश द्यावेत ! – संपादक) या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात समितीचे कर्मचारी शिवाजी साताप्पा साळवी यांनी तक्रार दिल्यानंतर संबंधित २ आस्थापनांसह अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट झाला आहे.

१. देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे यांच्यासह समितीच्या लेटरपॅडवर सदस्यांच्या खोट्या स्वाक्षर्‍या आणि शिक्के मारून मुंबईतील देव रिर्सोसेस इंडिया आणि एन्.एस्. कुंभार ट्रेडर्स अ‍ॅण्ड मिनरल्स, पेठवडगाव या आस्थापनांच्या नावे ही भूमी देण्याचा प्रयत्न झाला आहे.

२. हा प्रकार १६ ऑगस्ट २०१२ ते ३१ ऑगस्ट २०१५ या कालावधीत देवस्थान समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात झाल्याने समितीचे १८ सदस्य आणि कर्मचारी चौकशीच्या फेर्‍यांत अडकले आहेत.

३. या समितीवर पदे भूषवलेल्या काही सदस्यांनी चौकशी होऊ नये आणि २ मासांपूर्वी प्रविष्ट झालेली पोलीस तक्रार प्रसिद्धीमाध्यमांसमोर येऊ नये, यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव आणण्याचे प्रयत्न चालू केले आहेत.

४. या प्रकरणी विभागाच्या अधिकार्‍यांनी देवस्थान समिती सचिव शुभांगी साठे यांच्याकडे चौकशी केली असता, असा कोणताही आदेश झाला नसून माझ्या खोट्या स्वाक्षर्‍या कुणीतरी केल्या आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

५. पोलीस उपनिरीक्षक अमित मस्के यांनी शाहूवाडी तहसीलदारांना सादर केलेला प्रस्ताव अन्वेषण विभागाने आपल्या ताब्यात घेऊन त्यावर पुरावेसदृश ५०० पानांचा चौकशी अहवाल सिद्ध केला आहे.

६. कागदपत्रांवरील खोट्या स्वाक्षर्‍यांचे नमुने पुणे येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात येणार आहेत.

७. समितीच्या सचिव शुभांगी साठे यांनी कोणताही आदेश किंवा पत्र दिले नसतांना १८ ऑगस्ट २०१५ या दिवशी जावक रजिस्टरमध्ये काही नोंदी केल्या आहेत. हा प्रस्ताव खरा असल्याचे भासवून शाहूवाडी तहसीलदारांना सादर केला आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार आणि रजिस्टरमध्ये ठराव घुसडण्याचा प्रयत्न करणार्‍या समितीच्या ४ हून अधिक सदस्यांना पोलीस शोधत आहेत.

८. या प्रकरणाचे अन्वेषण अधिकारी असलेले पोलीस उपनिरीक्षक अमित मस्के यांचे कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात स्थानांतर (बदली) करण्यात आले आहे. त्यामुळे हे अन्वेषण नवनियुक्त अधिकारी दादासाहेब गोरे यांच्याकडे सोपवले आहे.
पश्‍चिम महाराष्ट्र व्यवस्थापन देवस्थान समितीचा घोटाळा प्रथम कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने उघड केला. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे कृती समितीने जनआंदोलन उभे केले. स्थानिक हिंदुत्ववाद्यांनी हे सूत्र उचलून धरत एक दिवस श्री महालक्ष्मीदेवीसाठी…. अशी हाक दिली. २ फेब्रुवारी २०१५ या दिवशी या घोटाळ्याच्या विरोधात २ सहस्रांहून अधिक हिंदूंनी रस्त्यावर उतरून विरोध केला. त्यांचे विधानसभेमध्ये शिवसेना आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी नेतृत्व केले. कोल्हापूर येथील आंदोलनानंतर या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने मुंबई येथे १९ मार्च २०१५ ला अधिवेशन काळात आंदोलन केले होते. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडीच्या) विशेष अन्वेषण पथकाद्वारे चौकशी चालू करण्यात आली. कालबद्ध चौकशी करून संबंधितांवर आरोपपत्र दाखल करावे, अशी अपेक्षा हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी व्यक्त केली होती.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *