Menu Close

अफझलखान वधाचे चित्र पाठ्यपुस्तकात समाविष्ट न केल्यास तीव्र आंदोलन करणार – शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांची चेतावणी

इयत्ता ४ थीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या आलिंगनाच्या वादग्रस्त चित्राचे प्रकरण

शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना यांची पत्रकार परिषदेद्वारे चेतावणी

balbharati_press_mumbai
डावीकडून श्री. राजेंद्र सावंत, श्री. बळवंत राव दळवी, डॉ. उदय धुरी, श्री. अभय वर्तक, श्री. प्रभाकर भोसले

मुंबई – बालभारतीने म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता ४ थीच्या शिवछत्रपती (परिसर अभ्यास – भाग २) या पुस्तकात अफझलखान वधाच्या चित्राच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाला आलिंगन देण्यास जात आहेत, असे दिशाभूल करणारे चित्र प्रकाशित केले आहे. हे वादग्रस्त चित्र पालटून पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक पराक्रमाच्या म्हणजेच अफजलखान वधाच्या चित्राचा समावेश करावा. येत्या ७ दिवसांत याविषयी काही कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना यांनी पत्रकार परिषदेत दिली. (अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी बहुसंख्यांकांचा जाज्ज्वल्य इतिहास दडपला जाणारा जगातील एकमेव देश भारत ! – संपादक)

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेला सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी, रायगड संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र सावंत, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुंबई समन्वयक श्री. बळवंतराव दळवी, श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत मान्यवरांनी मांडलेली मते !

चुकीच्या इतिहासाच्या विरोधात शिवप्रतिष्ठान संपूर्ण सामर्थ्यानिशी उभे रहाणार ! – बळवंतराव दळवी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या हातात वाघनखे होती. मग महाराज भेट द्यायला कसे जातील ? निधर्मी संघटना महाराजांच्या इतिहासात ढवळाढवळ का करतात ? आज विद्यार्थ्यांपर्यंत चुकीचा इतिहास पोचवला जात आहे. याविरोधात शिवप्रतिष्ठान संपूर्ण सामर्थ्यानिशी उभे रहाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचे षड्यंत्र कुणाच्या लांगूलचालनासाठी चालू आहे ? – राजेंद्र सावंत, रायगड संवर्धन प्रतिष्ठान

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान म्हणजे एकप्रकारचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच आहे. हे कुणाच्या लांगूलचालनासाठी चालू आहे ? शिवरायांचे नाव घेऊन सरकार सत्तेत आले आहे. आमच्या भावनांचा विचार कोण करणार ? सर्व हिंदुत्ववादी संस्थांच्या पुढाकारामुळेच अशा प्रकरणांची नोंद घेतली जाते.

मोहिमेला संपूर्ण पाठिंबा ! – प्रभाकर भोसले, शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळी

शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कळला असता, तर महिलांवरील अत्याचार थांबले असते. आज इतिहासाचे विद्रूपीकरण करण्यात आले आहे. सर्व शिवप्रेमींनी आरंभलेल्या मोहिमेला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे.

पुस्तकातील चित्रातून मुलांवर चुकीचा संस्कार होत आहे ! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराजाचे संस्थापक आहेत. त्यांचे आमच्यावर उपकार आहेत म्हणून आम्ही हिंदु आहोत; पण आज त्यांना निधर्मी ठरवले जात आहे. पुस्तकातील चित्रातून मुलांवर चुकीचा संस्कार होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अफजलखानाचा कोथळा काढणारे चित्र मंत्रालयात लावले पाहिजे. भारतात रहायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करावेच लागेल. शिवचरित्रामध्ये कोथळा काढल्याचा प्रसंग आहे, गळाभेटीचा नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

हिंदुत्ववादी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असे वागावे ! – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आपल्याला पत्रकार परिषद घ्यावी लागते, हे दुर्दैव आहे. ते राष्ट्राचे मानबिंदू आहेत. त्यामुळे त्यांचा अवमान करणारे पुस्तक तातडीने मागे घ्यावे आणि इतिहासद्रोहींवर कारवाई करावी. हिंदुत्ववादी सरकारने महाराजांना अपेक्षित असे वागावे.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *