छत्तीसगढची राजधानी रायपूर पासून ४५ किमीवर असलेले प्रसिद्ध ऐतिहासिक व धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाणारे राजीम गाव हे भारतातले पाचवे कुंभ मेळा भरविणारे स्थान म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी असलेले पंचमुखी कुलेश्वर मंदिर त्रिवेणी संगमावर असलेले अतिशय महत्त्वाचे स्थान असून हे मंदिर सीतामाईने वसविल्याचे सांगितले जाते. या मंदिराजवळच असलेले राजीवलोचन मंदिर व मामा मंदिर हीही भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. पंचमुखी कुलेश्वर मंदिराचे बांधकाम दगडात केले गेले असुन अष्टकोनी पायावर हे देखणे मंदिर उभे आहे.
राजीमला महानदी, पैरी व सोंडुल या नद्यांचा त्रिवेणी संगम असल्याने याला छत्तीसगडचे प्रयाग म्हणूनही ओळखले जाते. पद्मावतीपुरी, पंचकोशी, छोटी काशी अशीही त्याची अन्य नांवे आहेत. त्रिवेणी संगम असल्याने येथे श्राद्ध, पिंडदान, दान, दशकर्म असेही विधी केले जातात. वनवासात असताना राम, सीता, लक्ष्मण येथेच कांही दिवस कुटी बांधून राहिले होते असे सांगितले जाते.
प्राचीन त्रेतायुगापासून हे स्थळ असल्याचा समज आहे. पंचमुखी कुलेश्वर मंदिरात सीतामाईने शिवलिंग स्थापून पूजा केल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथात येतो. रामाची आई कौसल्या हिचे हे जन्मस्थळ आहे. येथे भरणार्या कुंभ मेळ्यासाठी देशभरातून साधूसंत व आखाडे येत असतात.
येथून जवळच असलेल्या मामा मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की जेव्हा नद्यांच्या पुराचे पाणी या मंदिरात घुसते तेव्हा मामा वाचवा असे आवाज येतात. पुराचे पाणी मामा मंदिरातील शिवलिंगाला लागले की पूर ओसरू लागतो. आजही येथे नावेतून जाताना मामा भाच्याला एकत्र प्रवास करू दिला जात नाही.
संदर्भ : माझा पेपर